मुंबई :- मंगळवारी सकाळी रुपयाचे मूल्य पुन्हा घसरून 80 रुपये 05 पैसे प्रति डॉलर या पातळीपर्यंत कोसळले होते. मात्र नंतर रिझर्व बॅंकेने काही प्रमाणात हस्तक्षेप केल्यामुळे दुपारच्या सत्रात रुपयाचे मूल्य वाढण्यास मदत झाली. शेवटी कालच्या तुलनेत रुपयाचा भाव सहा पैशांनी वाढून 79.92 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला.
दरम्यानच्या काळामध्ये शेअर बाजार निर्देशांक वाढले. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे रुपयाला आधार मिळाल्याचे विश्लेषकानी सांगितले.
एचडीएफसी सिक्युरिटीज संस्थेचे संचालक दिलीप परमार यांनी सांगितले की, वाढणारा डॉलर आणि कच्च्या तेलाचे दर यामुळे रुपयाच्या किमतीवर दबाव चालूच आहे.
मात्र आज रिझर्व बॅंकेने चलन बाजारात हस्तक्षेप केला, त्याचबरोबर शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्यामुळे दुपारच्या सत्रात रुपयाचा दर वाढू शकला. युरोपच्या रिझर्व बॅंकेची आणि जपानच्या रिझर्व बॅंकेची बैठक या आठवड्यात होणार आहे. या बैठकीतील निर्णयाचा काही प्रमाणात चलन बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.