रूपाली पाटील यांची न्यायालयाकडून मुक्तता

पुणे – पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या दारातील “बाऊन्सर’ हटवण्याचा पवित्रा घेऊन रुग्णालयात घुसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रूपाली पाटील यांना पोलिसांनी अटक केली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. पोलिसांकडून त्यांच्या 14 दिवसांच्या स्थानबद्धतेची मागणी करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत त्यांना मुक्त केले. ही मागणी प्रथमवर्ग न्यायाधीश ए. एस. राणे यांच्याकडे केली होती.
‘जम्बो’च्या दारात नेमलेले “बाऊन्सर’ रुग्णांच्या नातेवाईकांशी हुज्जत घालत आहेत. त्यावरून वाद घडत असल्याकडे लक्ष वेधत रूपाली पाटील आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मागील आठवड्यात शिवाजीनगर येथील “सीओईपी’च्या आवारात आंदोलन केले. तेव्हा विभागीय आयुक्त सौरभ राव आणि काही अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. राव यांना भेटण्याचा आग्रह करीत पाटील यांनी जम्बोच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून आत प्रवेश केला. तेव्हा तेथील सुरक्षाव्यवस्था आणि पाटील यांच्यात किरकोळ वादही झाला होता.
मात्र, आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणी अशा प्रकारे “बाऊन्सर’ का नेमता असा प्रश्न करीत पाटील या थेट राव यांच्याकडे गेल्या आणि त्यांच्याशी चर्चा केली. रूपाली पाटील यांच्या मागणीची दखल घेत, राव यांनी सुरक्षा व्यवस्थेला सूचना केल्या होत्या. त्यानंतरही “बाऊन्सर’ हटविण्यावरून रूपाली आणि त्यांचे कार्यकर्ते ठाम राहिले होते. त्यानंतर जम्बो व्यवस्थापनाकडून रूपाली यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या वतीने ऍड. विजय ठोंबरे यांनी न्यायालयात बाजू मांडली.





