Rupali Chakankar : नाशिक गुन्हे शाखेने बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेला स्वयंघोषित संख्याशास्त्रज्ञ आणि गॉडमॅन अशोक खरात ऊर्फ कॅप्टन खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर सध्या राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. खरात याने धार्मिक विधींच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप असून, या प्रकरणामुळे विरोधकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी चाकणकर यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. अंधारे यांनी दावा केला की, हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार अनामिका बोट हे यश आणि नेतृत्वाचे प्रतीक मानले जाते आणि खरातच्या सांगण्यावरून चाकणकर यांनी आपल्या हाताचे हे बोट कापले आहे. पुराव्यादाखल त्यांनी चाकणकर यांच्या हाताला पट्टी बांधलेले काही जुने फोटोही प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी चाकणकर यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. दुसरीकडे, अंजली दमानिया यांनी चाकणकर यांची हकालपट्टी करण्यासाठी राज्य सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला असून, कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मर्चंट नेव्हीतील माजी अधिकारी असलेला खरात हा श्री ईश्वनेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून चाकणकर या ट्रस्टच्या सदस्य आहेत. या प्रकरणाची व्याप्ती पाहता, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. चाकणकर यांचा खुलासा या सर्व आरोपांवर रूपाली चाकणकर यांनी एक्स वर आपली बाजू स्पष्ट केली. खरात याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्याच्यावरील आरोपांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला पोलिसांच्या तपासावर पूर्ण विश्वास असून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे त्यांनी नमूद केले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. अशी झाली अटकेची कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसांपूर्वीच या प्रकरणाची दखल घेऊन कडक कारवाईचे आदेश दिले होते. खरात याने एका ३५ वर्षीय महिलेला पतीच्या जिवाला धोका असल्याचे सांगून गुंगीचे औषध दिले आणि नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ दरम्यान तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी खरातला पळून जाण्याची संधी न देता, परिसरात चोरी झाल्याचे नाटक रचून अत्यंत गोपनीयरीत्या सापळा रचला आणि त्याला अटक केली. खरात सध्या २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत आहे.