Pimpri News : सभेपूर्वी सत्ताधारी नगरसेवकांची शाळा; नियम पाळण्याचे आदेश
Pimpri News : स्वकीयांकडूनच कोंडी होत असल्याने सावध भूमिका

पिंपरी – महापालिकेत सत्ता आल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरून सत्ताधारी भाजपाची कोंडी होत आहे. अनेकवेळा पदाधिकाऱ्यांना माफी देखील मागण्याची वेळ आली आहे.
तर नगरसेवकांच्या भूमिकेमुळे गट-तट देखील चव्हाट्यावर आले आहेत. अशी नामुष्की परत येऊ नये यासाठी आजच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची पदाधिकाऱ्यांनी शाळा घेत शिस्त पाळण्याचा सल्ला दिला.
सत्ताधारी पक्षनेत्यांच्या दालनात भाजपच्या सर्व नगरसेवकांची पूर्वबैठक पार पडली. यामध्ये सर्वसाधारण सभेचे कामकाज, परस्परांमधील समन्वय आणि सभागृहातील सदस्यांचे वर्तन याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक सदस्याने महापौरांची परवानगी घेऊनच बोलावे.
तसेच एकाच वेळी बोलणे, मध्यंतरी हस्तक्षेप करणे, भाषणात अडथळा आणणे किंवा कामकाजात गदारोळ घालणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. या बैठकीत वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, आक्षेपार्ह भाषा, घोषणाबाजी आणि गोंधळ टाळण्यावर विशेष भर देण्यात आला.
सदस्यांनी आपले मुद्दे वस्तुनिष्ठ व मुद्देसूदपणे मांडावेत आणि चर्चेचा रोख संबंधित विषयापुरताच मर्यादित ठेवावा, असे सांगण्यात आले. महापौरांच्या निर्देशांचे पालन न केल्यास किंवा वारंवार शिस्तभंग केल्यास नियमानुसार कारवाई होऊ शकते, याचीही आठवण करून देण्यात आली.
महापालिकेच्या प्रस्तावांवर उपसूचना द्यायची असल्यास ती शक्यतो सर्वसाधारण सभेच्या किमान एक दिवस आधी लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऐन वेळी उपसूचना आणून सभागृहात मांडण्याऐवजी आधी तिच्या नियमांची पडताळणी केली जाईल. तसेच प्रशासकीय बाजू तपासून घेण्यात येईल.
स्वकीयांना सांभाळण्याची धडपड?
भाजपच्या या पूर्वबैठकीला आगामी सर्वसाधारण सभेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. सत्ताधारी पक्षाकडून सभागृहाचे कामकाज नियमबद्ध आणि लोकहितावर केंद्रित ठेवण्याचा दावा केला जात असला, तरी सातत्याने समोर येणाऱ्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक ‘आधी स्वतःचे घर सावरण्याची’ धडपड म्हणूनच पाहिली जात आहे. आता या बैठकीत दिलेले शिस्तीचे धडे या सर्वसाधारण सभेत प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतात याकडे लक्ष लागले आहे.
Satara: महावितरणच्या बारामती परिमंडळातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी





