Satara: महावितरणच्या बारामती परिमंडळातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Satara यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून, साताऱ्यातील पालकमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन कथित गैरप्रकार निदर्शनास आणून देण्यात आला आहे.

Satara: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) बारामती परिमंडळांतर्गत वरिष्ठ पातळीवर कथित अनागोंदी व गैरकारभार सुरू असून, त्यामुळे कंपनीचे लाखो ते कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि कालबद्ध उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोरेगाव तालुकाध्यक्ष सागर संभाजी बर्गे, शेतकरी हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिर्के, शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते रावळेश्वर घोरपडे आणि मधुकर चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून, साताऱ्यातील पालकमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन कथित गैरप्रकार निदर्शनास आणून देण्यात आला आहे. बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, सातारा मंडलचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हाळनोर, सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित बारटक्के आणि वडूज विभागाचे कार्यकारी अभियंता भीमराव मस्के यांच्या कार्यकाळातील विविध निर्णय व कामकाजाची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.चौकशीवर कोणताही प्रभाव पडू नये म्हणून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित चारही अधिकाऱ्यांची अकार्यकारी पदावर बदली करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.





