महाराष्ट्रात कायद्याचे राज्य; भाजपकडून अतिरेक्यांसारख्या कारवाया : संजय राऊत

मुंबई – केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्यात सुरू असणारी कारवाई ही अतिरेक्यांप्रमाणे आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दबावात ज्याप्रमाणे अतिरेकी कारवाया करत आहे. त्याप्रमाणे आम्ही कारवाया करणार नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कायद्यानुसार कारवाई होईल.
केंद्रीय तपास यंत्रणा ज्याप्रमाणे राज्यात घुसून बेकायदेशीरपणे विरोधकांवर कारवाई करत आहे. तसं महाराष्ट्र सरकार कारवाई करणार नाही. सूडाने कारवाई होणार नाही, राज्यात कायद्याचे सरकार असल्याने नियमांने कारवाई होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
भाजपच्या अतिरेकी कारवायांना “जशास तसे’ उत्तर द्यावे असे माझ्यासह इतरांचेही मत असल्याचे त्यांनी म्हटले. ज्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावर योग्य कारवाई होईल. मुख्यमंत्र्यांसमोर असलेल्या विषयांवर त्यांचे लक्ष असल्याचेही राऊत यांनी म्हटले. गृहमंत्री उत्तम काम करत आहेत. सरकारमधील प्रमुख नेत्यांमध्ये कोणताही विसंवाद नाही. या नेत्यांमध्ये योग्य संवाद असून विरोधकांनी अफवा पसरवू नये, असेही राऊत यांनी सांगितले.





