खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाईसाठी ‘आरटीओ’चे प्रवाशांना आवाहन

पुणे – दिवाळीच्या सुटीत गावी जाणाऱ्या गर्दीचा फायदा घेत काही ट्रॅव्हल्स बस कंपन्यांनी जादा भाडे आकारून प्रवाशांची लुट सुरू केली आहे. यावर प्रवाशांना आता आरटीओकडे थेट व्हॉट्स ऍपद्वारे तक्रार करता येणार आहे. त्यानंतर कारवाईचे पाऊल उचलले जाणार आहे. या बसचालकांना जास्तीतजास्त एसटीच्या वाढीव दराच्या दीडपटीपेक्षा अधिक तिकीट दर आकारता येणार आहे, असेही प्रशानाने म्हटले आहे.
दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाकडून दिवाळीमध्ये तिकीट दरामध्ये दहा टक्के वाढ केली जाते. त्यानुसार येत्या 8 ते 27 नोव्हेंबरच्या काळात शिवनेरी बस वगळता अन्य शिवाशाही, निम आराम, रात्रसेवा आणि साधी बसमध्ये नेहमीच्या तिकिटदरापेक्षा सरासरी 10 ते 55 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
आता याच वाढलेल्या तिकीट दराच्या दीडपटीपेक्षा अधिक तिकीट खासगी बस चालकांना आकारता येणार नाही. त्याबाबत सर्व खासगी बस मालक, असोसिएशन यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे आरटीओने म्हटले आहे. दरम्यान, बसद्वारे केली जाणारी भाडेवाढ तपासण्यासाठी चार पथके तैनात केली असून, मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई यासह अन्य मार्गांवर ही पथके तपासणी करणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.
अशी करता येणार तक्रार
- व्हॉट्स ऍप क्रमांक : 82753-30101
- ई-मेल – buscompalint@[email protected]
सोबत तक्रारदाराने स्वत:चे नाव, मोबइल क्रमांक, प्रवास मार्ग, बस क्रमांक, बस प्रकार, बसचा फोटो आणि तिकिटाचा फोटो ही माहिती देणे आवश्यक





