पुणे | आरटीई ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया; अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत काढण्यात आली. या सोडतीद्वारे शाळा मिळालेल्या पालकांना दि. १२ जूननंतर प्रवेशाचे एसएमएस पाठविण्यात येणार आहेत.
कुमठेकर रस्त्यावरील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे सकाळी ११.३० वाजता इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. याप्रसंगी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, प्राथमिक सहसंचालक देविदास कुलाळ, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक शोभा खंदारे, उपसंचालक कमलादेवी आवटे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
याबाबत गोसावी म्हणाले की, आरटीईची सोडत काढल्यानंतर मुलांच्या प्रवेशासाठी १२ जूननंतर पालकांना एसएमएस पाठविण्यात येतील, तसेच यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्यामुळे काही दिवस पालकांनी प्रतीक्षा करावी.
काही माध्यमिक शाळांनी घेतलेल्या निर्णयाबाबत न्यायालयात १२ जूनला सुनावणी आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, दरवर्षी प्रवेश प्रक्रिया संपायला सप्टेंबर महिना उजाडतो. त्यामुळे यंदाही सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार असल्याचे दिसून येत आहे.





