पिंपरी | आरएसएसचे शहरात ठिकठिकाणी पथसंचलन उत्साहात

पिंपरी, (प्रतिनिधी)- विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर सकाळी शहराच्या विविध भागांमधून आरएसएसच्या पथकांनी संचलन केले.
संघ गणवेशातील शिस्तबद्ध दंडधारी स्वयंसेवक, लयबद्ध रचना सादर करीत हे संचलन पार पडले. शहराच्या विविध भागांतील नागरिकांनी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी निमित्याने शहरात शनिवारी (दि.12) पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 26 ठिकाणी देहूरोड आकुर्डी, रावेत,हिंजवडी पूनावळे, वाकड थेरगाव, चिंचवड पूर्व – पश्चिम, पिंपरी, काळेवाडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव,
सांगवी, कासारवाडी, आळंदी, मोशी, संभाजी नगर, चिखली,आळंदी, निगडी या भागात सकाळी तर देहू, संत तुकाराम नगर, दिघी, चर्होली, भोसरी, इंद्रायणी नगर भागात सायंकाळी नियोजित मार्गावर संघ गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन उत्साहात पार पडले.
घोषाच्या तालावर हजारो स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेऊन सामूहिकतेचे दर्शन घडविले. विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी, लोकप्रतिनिधी विविध भागातील संचलनात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी उस्फूर्तपणे पुष्पवृष्टी, भारत माता की जयच्या जयघोषात रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भव्य स्वागत केले.





