दुध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपयांचे अनुदान ! राधाकृष्ण विखे-पाटील यांची मोठी घोषणा

नागपूर – दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
विखे पाटील म्हणाले, ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार आहे. यासाठी सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफकरीता प्रति लिटर किमान 29 रुपये दूध दर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रोख जमा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत 5 रुपये प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील, असे विखे पाटील म्हणाले.
दरम्यान, डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील.
ही योजना दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागु राहणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेवून मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. ही योजना आयुक्त ( दुग्धव्यवसाय विकास ) यांच्या मार्फत राबविली जाणार आहे. याबाबतीत शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे.





