16 गावांसाठी 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर – नीलेश लंके

पारनेर -जलजीवन मिशन अंतर्गत कान्हूर पठारसह 16 गावांसाठी 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. नीलेश लंके यांनी दिली आहे.
कान्हूर पठारसह 16 गावांतील पाणीयोजनेच्या विविध विकासकामांसाठी जवळपास 50 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनदरबारी टाकला होता. त्यानुसार जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आ. लंकेच्या यांच्या प्रयत्नातून कान्हूर पठार व 16 गावे पाणीपुरवठा योजनेस 38 कोटी 48 लाख निधीच्या कामास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या गावांच्या पाणीयोजनेस पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली असून, थकीत वीजबिलासह इतर दुरुस्तीसाठीही सरकारने निधी दिला आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 16 गावांच्या पाणी योजनेसाठी जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी योजनेचे जॅक वेलसह पंपहाऊस योजनेतील अनेक गावांत वाढीव साठवण पाण्याच्या टाक्या योजनेतील जलवाहिनी दुरुस्ती वीजबिल यांच्यासह जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्तीसाठी वितरण व्यवस्था निधी देण्यात आलेला आहे. थकीत वीज बिलामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही पाणी योजना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे आ. लंके यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून निधी मिळावा अशी वेळोवेळी मागणी केली होती.
मांडओहोळ धरणावरून असलेली ही योजना कार्यानित करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आ. लंके यांच्याकडे केली होती. त्यानुसार आ. लंके यांच्या प्रयत्नांना यश आले असून, या पाणी योजनेसाठी जवळपास 39 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न ः घुले
दोन दिवसांत सरकार आले आणि लगेच निधी मिळाला असे कधी होत नाही. त्यामुळे ज्यांना आपल्या गावातील रस्ते दुरुस्त करता आले नाही, खड्डे बुजवता आले नाही, त्यांनी विकासकामांचे श्रेय घेऊ नये, असा टोला सुजित झावरे यांना लगावला असून, विरोधकांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक घुले यांनी टीका केली आहे.





