महिलांना तीन हजार रुपये, तर बेरोजगारांना दरमहा 4 हजार; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

MVA Manifesto 2024 Maharashtra | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यात महिला, तरुण, शेतकरी यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असं नाव देण्यात आलं आहे. यात लाडकी बहीण योजनेऐवजी महालक्ष्मी योजना आणणार असून त्यातून महिलांना तीन हजार रुपये देणार आहे. शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
महाविकास आघाडीचा पुढील 100 दिवसांचा कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात आला. त्यात ६ गॅस सिलिंडर प्रत्येकी ५०० रुपयांत उपलब्ध करून देणार. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करणार आहे. एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करुन ४५ दिवसांत निकाल लावण्यात येणार आहे. पदवीधर आणि पदविका असलेल्या बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने आणि देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी पाच गॅरंटी आधी जाहीर केलेल्या आहेत. सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वात आधी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची आहे. महाराष्ट्र विकासासाठी आमचा पंचसूत्री कार्यक्रम असल्याचंही मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलं. प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 3 लाख रुपयांची मदत देणार असून, लाडकी बहीण योजनासुद्धा आमची कॉपी केली आहे, आम्ही कर्नाटकात दोन हजार रुपये आधीच दिलेत, असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय ?
-शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट
-आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार आणि जातीनिहाय जणगणनना करणार
– 300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत
– दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार. महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी ‘निर्भय महाराष्ट्र’ धोरण आखणार, तसेच ‘शक्ती’ कायद्याची अंमलबजावणी करणार.
– शेतमालाला हमीभाव देणार, पीकविम्याच्या जाचक अटी काढणार
-सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन आणि 2.5 लाख नोकरभरती करणार
– अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार
– बार्टी, महाज्योती, सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार, एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार
-महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार
-महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार
-जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार
-महिलांचा बस प्रवास मोफत करणार
-सहा घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देणार
-महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार.
-वीजग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेणार
-युवकांच्या कल्याणासाठी ‘युवा आयोगा’ची स्थापना करणार
-शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार
– 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देण्यात येणार
-सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार
-महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार
-बिनाव्याज पाच लाख कर्ज देणार, कंत्राटी नोकरभरती बंद करणार
-महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार
-सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
-शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार
-जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार आणि महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करणार.
हेही वाचा:
कपिल शर्माच्या शोमध्ये नवजोत सिंग सिद्धूची होणार पुन्हा एन्ट्री





