stock market : शेअर बाजारात 3 दिवसात 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान

मुंबई – विकासदर कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रुपयाचे वेगाने अवमूल्यन होत आहे. गुंतवणूकदारांनी धीर सोडल्यासारखे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेअर बाजारात एकतर्फी विक्री चालू आहे. अशा परिस्थितीत सलग तिसर्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट नोंदली गेली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांमध्ये शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मूल्य 12 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 429 लाख कोटी रुपये झाले आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 241 अंकांनी कमी होऊन 77,378 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.40 टक्क्यांनी म्हणजे 95 अंकांनी कोसळून 23,431 अंकावर बंद झाला. आठवड्याच्या पातळीवर निर्देशांकाची बरीच हानी झाली. सरलेल्या आठवड्यामध्ये सेन्सक्स 1,844 अंकांनी म्हणजे 2.32 टक्क्यांनी तर निफ्टी 573 अंकांनी म्हणजे 2.38 टक्क्यांनी कमी झाला.
जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, खनिज तेलाच्या किमती वाढत आहेत. हा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा नवा विषय समोर आला आहे. त्याचबरोबर डॉलर वधारत आहे. मात्र डॉलर वधारत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या निर्देशांकात वाढ होण्यास मदत मिळाली. तरीही शेअर बाजारातील एकूण वातावरण नकारात्मक असल्यामुळे निर्देशांक कमी होत आहेत.
मेहता इक्विटीज या संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यापासून निर्देशांकात बरीच घट झाली आहे. मात्र तरीही भारतीय कंपन्यांच्या शेअरचे भाव आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत अशी भावना परदेशातील गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्याचे आकर्षण वाढल्यामुळे हे गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. आता कंपन्या कसे ताळेबंद जाहीर करतात आणि अर्थसंकल्प कसा असेल यावर निर्देशांकाची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.
कोणत्या कंपन्या पिछाडीवर
आज झालेल्या विक्रीचा फटका इंडसइंड बँक, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, अॅक्सिस बँक, स्टेट बँक, टाटा स्टील, पावर ग्रीड, अदानी पोर्ट्स, कोटक महिंद्रा बँक या कंपन्यांना बसला. टेक महिंद्रा आणि टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. मात्र त्यामुळे निर्देशांकांना आधार मिळू शकला नाही. स्मॉल कॅप 2.40 टक्क्यांनी तर मिडकॅप 2.13 टक्क्यांनी कोसळले. ऊर्जा, ग्राहक वस्तू या क्षेत्राच्या निर्देशांकावर जास्त परिणाम झाला.

