RR vs LSG : ‘१४ वर्षांचा मुलगा लोकांना वेडं बनवतोय…’, अर्शीन कुलकर्णीचा वैभवबद्दल मोठा खुलासा

RR vs LSG Vaibhav Suryavanshi and LSG Player Arshin Kulkarni Video : राजस्थान रॉयल्सचा सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेषतः, त्याच्या वयाबद्दल बरीच चर्चा आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती कौतुकास्पद आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लखनौच्या खेळाडूंसोबत दिसत आहे.
लखनौविरुद्ध खेळताना, वैभव सूर्यवंशीने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि वयामुळे त्याच्यावर कोणतेही दडपण नसल्याचे दाखवून दिले. त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध २० चेंडूत ३४ धावांची एक छोटी पण महत्त्वाची खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने ३ षटकार आणि २ चौकार मारले. त्यानंतर त्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरंतर, सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये वैभव सूर्यवंशी लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूंना भेटताना दिसत आहे.
अर्शीन कुलकर्णीने वैभव सूर्यवंशीबद्दल केला खुलासा –
View this post on Instagram
लखनौमध्ये उपस्थित असलेल्या अर्शिन कुलकर्णीला त्याची एक बॅट देत तो म्हणाला, “ही बॅट खूप छान आहे, ही जोस बटलरची बॅट आहे.” मग त्याच्या शेजारी उभा असलेला एक खेळाडू म्हणतो, ‘तू त्याला तुझी बॅट का देत आहेस.’ यानंतर अर्शीन कुलकर्णी म्हणते, “हे रेकॉर्ड करा, हा १४ वर्षांचा मुलगा लोकांना वेड लावत आहे. त्याने ३ वेळा तुटलेली बॅट दिली आहे.” यावर वैभव म्हणतो की, “माझ्याकडे बॅट नाहीये, मी संजू भाईच्या (संजू सॅमसन) बॅटने सामना खेळलो.” विशेष म्हणजे वैभवला आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने १.१ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
हेही वाचा – RR vs LSG : पदार्पणातच मोठा धमाका करणारा वैभव सूर्यवंशी का रडला? कोचने केला खुलासा
वैभव पाठोपाठ आवेश खानने वेधले सर्वांचे लक्ष्य –
वैभवचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला. त्याने राजस्थान संघासोबत त्याचा १४ वा वाढदिवस साजरा केला. तथापि, काही चाहते सोशल मीडियावर त्याच्या वयाबद्दलही प्रश्न उपस्थित करत आहेत. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, लखनौ सुपर जायंट्सने प्रथम खेळताना १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघ निर्धारित २० षटकांत केवळ १७८ धावा करू शकला. लखनौच्या विजयात आवेश खानने मोठी भूमिका बजावली, ज्याने शेवटच्या ३ षटकात राजस्थानच्या ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतले आणि शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी करताना ९ धावांचा यशस्वीपणे बचाव केला.





