RR vs CSK : ज्याला वाढवलं, त्यानेच संपवलं! रवींद्र जडेजाने ५ चेंडूत चेन्नईची दाणादाण उडवली; धोनीच्या सैन्याची राजस्थानसमोर शरणागती
RR vs CSK : गुवाहाटीच्या खेळपट्टीवर राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजीचे अक्षरशः लचके तोडले. विशेष म्हणजे, ज्या खेळाडूने १२ वर्षे चेन्नईची सेवा केली, त्याच रवींद्र जडेजा याने आज आपल्या जुन्या संघाचा घात केला.

RR vs CSK Ravindra Jadeja take 2 wickets : आयपीएल २०२६ च्या सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सचा संघ राजस्थान रॉयल्ससमोर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. चेन्नईचा टॉप आणि मिडल ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरला. मात्र, या सामन्यात खरी चर्चा रंगली ती ‘सर’ रवींद्र जडेजाची. तब्बल १७ वर्षांनंतर राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत मैदानात उतरलेल्या जडेजाने अवघ्या ५ चेंडूंच्या खेळात चेन्नईच्या मधल्या फळीची हवा काढली.
जडेजाचा ‘डबल’ धमाका!
राजस्थानचा कर्णधार रियान परागने ८ व्या षटकात चेंडू जडेजाच्या हातात सोपवला. जडेजाने आपल्या दुसऱ्याच चेंडूवर सर्फराझ खानला पायचीत (LBW) करून तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने जडेजाला षटकार मारून डिवचण्याचा प्रयत्न केला, पण जडेजाने चतुराई दाखवत त्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर दुबेला बाद करून चेन्नईला मोठा धक्का दिला. जडेजाने ३ ओव्हरमध्ये अवघ्या १८ धावा देत २ महत्त्वाचे विकेट्स घेतल्या.
ट्रेडचा फटका चेन्नईला बसला?
A special return in Pink for Ravindra Jadeja 🩷
🎥 Two quick wickets in his very first over back for the Royals 🔥
Updates ▶️ https://t.co/UzbuFk5G26#TATAIPL | #KhelBindaas | #RRvCSK | @rajasthanroyals | @imjadeja pic.twitter.com/leq4EyMRha
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2026
यंदाच्या लिलावापूर्वी चेन्नईने रवींद्र जडेजाला राजस्थानकडे ट्रेड करून त्यांच्याकडून संजू सॅमसनला आपल्या संघात घेतले होते. मात्र, पहिल्याच सामन्यात हा निर्णय चेन्नईला महागात पडताना दिसला. संजू सॅमसन पदार्पणात केवळ ६ धावा करून बाद झाला, तर जडेजाने चेंडूने आपली छाप पाडली.
चेन्नई अवघ्या १२७ धावांत गारद –
एका वेळी चेन्नईचा संघ १०० धावांच्या आतच बाद होईल असे वाटत होते, पण जेमी ओव्हरटनच्या ३६ चेंडूतील ४३ धावांच्या खेळीमुळे चेन्नईने १२७ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून नांद्रे बर्गर आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर रवी बिश्नोई, संदीप शर्मा आणि ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. १२८ धावांचे छोटे आव्हान पार करताना राजस्थानचे पारडे आता जड दिसत आहे.





