नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल दिल्लीतील सत्तेला निरोप देतील, असे सांगतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आरपीआय निवडणुकीत 15 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली. रामदास आठवले म्हणाले, दिल्ली निवडणूकीमध्ये काही जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. तर उर्वरित जागांवर भाजप उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. दिल्लीत ऐतिहासिक बहुमताने भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पक्षाला सत्तेपासून दूर करण्यासाठी काम करेल आणि काँग्रेसला पुन्हा दिल्लीत शून्य जागा मिळवून देण्यासाठी काम करेल, असे रामदास आठवले म्हणाले. देशाच्या राजधानीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याऐवजी भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे आश्वासन देणाऱ्या आपने पोकळ घोषणा केली आहे. जागतिक दर्जाच्या शाळा बांधण्याचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांनी दोन लाखांहून अधिक मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. दारू घोटाळ्याने संपूर्ण दिल्लीला बदनाम करण्याचे काम अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा देईल, असे त्यांनी सांगितले.