जगभरात एक पॉवरफुल आणि रुबाबदार मोटारसायकल म्हणून रॉयल इनफिल्डच्या गाड्यांची ख्याती आहे. गेल्या दशकात भारतातील तरुणांकडून या गाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्यामुळे रस्त्यावर ही गाडी अनेकदा दिसते. रॉयल इनफिल्ड क्लासिक 500 बरीच लोकप्रिय झाल्यानंतर या गाडीचा छोटा व्हर्जन म्हणजे रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 उपलब्ध करण्यात आल्यानंतर या गाडीलाही भारतातून बरीच मागणी आली.
मुळातच या गाडीचा ब्रॅंड उच्च दर्जाचा आहे. त्यातच रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 ला मिळालेल्या रेट्रो डिझाईनमुळे या गाडीचे आकर्षण मूल्य वाढले आहे. रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 मध्ये यूसीई इंजिन 346 सीसीची पॉवर निर्माण करते. या इंजिनची कार्यक्षमता वाढविण्यात आल्यामुळे गाडी मोठी असूनही इंधन कार्यक्षमता उंचावण्यामध्ये यश मिळाले आहे. त्यामुळे सुरक्षित आमि रूबाबदार प्रवासासाठी या गाडीचा वापर वाढू लागला आहे. कारण तुलनेने रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 ही रॉयल इनफिल्ड क्लासिक 500 पेक्षा थोडी स्वस्त आणि हलकी पडते.
सिंगल डाऊन ट्यूब चेसिसवर घडणावळ केलेली रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 ही 2160 मि.मी. लांब, 790 मि.मी. रूंद व 1090 मि.मी. उंच आहे. व्हील बेस 1370 मि.मी. तर ग्राऊंड क्लिअरन्स 135 मि.मी. आहे. या अगोदरच्या मॉडेलनुसार यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यात क्रोम बॉर्डड् राऊंड हेडलॅम्प आणि सुधारित हॅंडलबारचा समावेश आहे. पेंटेड सस्पेन्शन, राऊंड फ्युअल टॅंक आणि मजबूत मडगार्ड ही या गाडीची आणखी डोळ्यात भरण्यासारखी वैशिष्ट्य आहेत.
टेल लॅम्प इंडिकेटरसह वेगळा करण्यात आलेला आहे. सिंगल सॅडल सीट स्प्रिंगसह असल्यामुळे प्रवास अधिक आरामदायक होतो. गाडीला सिंगल सिलिंडर 4 स्ट्रोक ट्विनस्पार्क 346 सीसीचे इंजिन आहे. ऍनॉलॉग स्पिडोमीटर, बॅटरी इंडिकेटर, ओडो मीटर यांचा समावेश गाडीत करण्यात आला आहे. मात्र, ऍन्टिलॉक ब्रेकिंग सिस्टिम, ट्रीप मीटर यांचा मात्र समावेश करण्यात आलेला नाही.