गुलाब उत्पादक शेतकरी संकटात

मावळ : विमानसेवा बंद असल्याने बसतोय फटका
पवनानगर – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. विमानसेवा बंद केल्याने मावळातील शेतकऱ्यांची गुलाबाची विक्री ठप्प झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील फूलउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मावळात सार्वाधिक गुलाबाचे उत्पन्न घेतले जाते. मावळात अडीचशे हेक्टरवर पॉलिहाऊस क्षेत्र आहे. यामध्ये 225 हेक्टरवर गुलाब शेती केली जाते. तर उरलेल्या क्षेत्रावर जरबेरा तसेच पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. मावळातून जपान, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रोलिया, यांसह इतर देशांमध्ये फुलांची सर्वाधिक निर्यात होते. तर भारतातील स्थानिक बाजरपेठांमध्येही येथून फुले जातात.
जानेवारी ते व्हॅलेंटाइन डे च्या दरम्यान फुलांना चागंला भाव मिळाला तसेच स्थानिक बाजारपेठांमध्ये हंगाम सुरू होत असतानाच जगभरात हाहाकार माजविलेल्या करोना विषाणूमुळे सरकारने 17 मार्च रोजी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले. तर 22 मार्चपासून संपूण भारत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्यांतर्गत वाहतूकही बंद करण्यात आली. त्यामुळे गुलाबविक्री ठप्प झाली. तसेच स्थानिक ठिकाणी जमावबंदी, संचारबंदी असल्यामुळे कोणतेही उत्सव, कार्यक्रम होत नाहीत.
तसेच लग्नसराईचा हंगाम ही संपुष्टात आला असून, गुलाबाची फुले सध्या फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील फूलउत्पादक शेतकऱ्यांचे दिवसाला खूप मोठे नुकसान होत आहे. गुलाब जरी बजारात जात नसला तरी त्यांना खते, औषधे द्यावी लागतात कामासाठी मजूर लागतात, खर्च करावा लागतो. मात्र उत्पादन नाही. गुलाब हा जीवनावश्यक नाही म्हणून किती दिवस असे राहील माहिती नाही. त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न गुलाब उत्पादक शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. गुलाब परदेशात निर्यात होत होते तेव्हा देशाला परकीय चलन उपलब्ध होत होते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष वेगळी योजना आखावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून
होत आहे.
पवना फूलउत्पादक संघाची पवनानगर परिसरामध्ये गुलाब शेती आहे. त्यांचे दररोज सव्वा लाख रुपयापर्यंत नुकसान होत आहे. तर मावळ तालुक्यातील फूल शेतीचे दिवसाला साधारण 50 लाख रुपयांपर्यंत नुकसान होत आहे. फूल शेतीमधून देशाला परकीय चलन उपलब्ध होत असल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आखावी.
– मुकुंद ठाकर, अध्यक्ष पवना फूलउत्पादक संघ.





