Rose Farming: सातगाव पठारावर गुलाब शेतीचा सुगंध; आधुनिक प्रयोगातून शेतकरी झाला लखपती
Rose Farming: पारंपरिक बटाटा पिकाला फाटा देत शेतकरी वळले पर्यायी पिकांकडे; बदलत्या बाजारपेठेचा अभ्यास ठरला फायदेशीर.

Rose Farming – राज्यात बटाटा पिकासाठी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावर बदलत्या हवामानामुळे शेतीचे चित्र बदलताना दिसत आहे. अनियमित पाऊस आणि वाढत्या पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत असताना येथील शेतकरी संतोष भिकाजी धुमाळ यांनी आधुनिक शेतीचा मार्ग स्वीकारत पॉलिहाऊसमध्ये गुलाब शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
सन २००३ पासून गुलाब शेती करणाऱ्या धुमाळ यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून पॉलिहाऊसमध्ये उच्च दर्जाच्या गुलाबांची लागवड सुरू केली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी शेततळे उभारले असून आठ बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली आहे. ठराविक अंतराने सिंचन करून त्यांनी उत्पादन सातत्याने वाढवले आहे. जून महिन्यात लागवड केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत उत्पादन सुरू होते आणि वर्षभर उत्पन्न मिळत राहते.
लग्नसराईच्या हंगामात गुलाबांना मोठी मागणी असल्याने त्यांना चांगला दर मिळाला होता. त्यानुसार सद्यस्थितीत एका गुलाबाच्या फुलाला ७ ते १० रुपये दर मिळत असून महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्येही त्यांच्या फुलांना मोठी मागणी आहे. बदलत्या बाजारपेठेचा अभ्यास, पाण्याचे योग्य नियोजन आणि आधुनिक शेतीचा स्वीकार केल्यास कमी क्षेत्रातूनही मोठे उत्पन्न मिळू शकते, हे संतोष धुमाळ यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
“पारंपरिक शेतीत अनिश्चितता वाढत असल्याने आम्ही बाजारपेठेचा अभ्यास करून गुलाब शेतीकडे वळलो. पाण्याचे योग्य नियोजन, सातत्य आणि गुणवत्तेमुळे आज आमच्या उत्पादनाला राज्याबाहेरही चांगली मागणी मिळत आहे.”
– संतोष भिकाजी धुमाळ,फुल उत्पादक, शेतकरी पेठ.
“बटाटा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सातगाव पठारावर बदलत्या हवामानामुळे शेतीचे चित्र बदलताना दिसत आहे. अनियमित पाऊस आणि वाढत्या पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत आहे.”
– रामशेठ तोडकर,माजी सरपंच पेठ.





