रूपगंध : युद्धबंदीबाबत प्रश्नचिन्ह

– आरिफ शेख
अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड होऊ द्या, चुटकीसरशी रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याची भाषा करणार्या डोनाल्ड ट्रम्प यांना आता हे आव्हान किती अवघड आहे, हे लक्षात आले असेल. रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी ट्रम्प यांना खेळवण्यास कशी सुरुवात केली आहे, हे जग पाहत आहे. बढायाखोर माणसांच्या वाट्याला दुसरे काहीच येत नसते. आता युद्धबंदीची चर्चा सुरू झाली असली, तरी त्यानंतरही होणारे हल्ले पाहता युद्धविराम सध्या तरी अवघड दिसत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोन कॉल केल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ऊर्जा सुविधांवर हल्ले थांबविण्यास सहमती दर्शविली; परंतु युक्रेनमध्ये त्वरित पूर्ण युद्धविराम नाकारला. अलीकडेच, पुतीन यांनी सौदी अरेबियातील युक्रेनियन अधिकार्यांसह ट्रम्प यांच्या टीमने तयार केलेल्या महिन्याभराच्या संपूर्ण युद्धबंदी योजनेवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. युक्रेनला परकीय मदत आणि गोपनीय माहिती मिळणे बंद केले, तरच सर्वसमावेशक युद्धविराम शक्य होईल, असे ते म्हणाले. युक्रेनच्या युरोपीय मित्र राष्ट्रांनी ही अट आधीच नाकारली आहे. अमेरिका आणि युक्रेन यांच्यात या आठवड्यात सौदी अरेबियात चर्चा होणार आहे. गेल्या तीन वर्षांच्या युद्धादरम्यान, सहा महिन्यांपूर्वी युक्रेनियन सैन्याच्या ताब्यात असलेला कुर्स्कचा बहुतांश भाग रशियाने नुकताच पुन्हा ताब्यात घेतला आहे. ट्रम्प आणि पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेत एक आठवड्यापूर्वीच्या अमेरिकेच्या भूमिकेतून माघार घेण्यासारखे होते.
तथापि, दोन्ही नेत्यांनी लवकरच मध्यपूर्वेतील शांतता चर्चा सुरू ठेवण्याचे मान्य केले. गेल्या मंगळवारी, जेव्हा अमेरिकेच्या शिष्टमंडळाने जेद्दाहमध्ये युक्रेनच्या शिष्टमंडळाची भेट घेतली, तेव्हा त्यांनी युक्रेनला तात्काळ 30 दिवसांच्या युद्धबंदीसाठी राजी केले. यामध्ये जमीन, हवाई आणि समुद्रावरील संपूर्ण युद्धविरामाचा समावेश होता. तथापि, ट्रम्प-पुतीन यांच्यात झालेल्या संभाषणानंतर काही वेळातच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी फिनलँड येथे सांगितले, की युक्रेन ऊर्जा संयंत्रांवर हल्ले थांबविण्यासाठी तयार आहे; परंतु कराराच्या इतर तपशीलांपर्यंत पोहोचण्याची प्रतीक्षा करण्यास सांगितले; मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे पुतीन यांनी युद्धविराम नाकारल्याचा आरोप त्यांनी केला. ट्रम्प हे जरी पुतीन यांच्याशी मोठ्याने बोलले असले, तरी त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.
त्यांनी युक्रेनमधील शांतता कराराच्या दिशेने प्रगती केली आहे, एवढा दावा करण्या इतपत त्यांना संधी मिळाली. रशियाने या संधीचा फायदा घेतल्याचे दिसून येणार नाही, असेही सांगितले जात होते; परंतु तसे झालेले नाही. युक्रेनच्या ऊर्जा केंद्रांवर होणारे हल्ले 30 दिवसांसाठी थांबवले जातील, असे पुतीन यांनी दिलेले वचन ट्रम्प आपले यश म्हणून दाखवू शकतात. ऊर्जा केंद्रांवर होणारे हल्ले थांबले, तर सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे; पण अमेरिकेला रशियाकडून पूर्ण आणि बिनशर्त युद्धविराम हवा होता; परंतु दोघांच्या चर्चेतून काहीच हाती आले नाही. ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाला ‘भयंकर युद्ध’ म्हटले आणि ते मीच थांबवू शकतो, असा दावा केला; परंतु आता त्यांना आपल्या गर्जनेतील फोलपणा लक्षात आला आहे.
रशियाच्या माध्यमांनी दोघांतील चर्चेबद्दल सांगितले, की दोन्ही अध्यक्ष दोन तासांहून अधिक काळ फोनवर बोलले. या संभाषणावर रशियाने 500 शब्दांचे निवेदन जारी केले आहे. त्या निवेदनात दोघांमधील संभाषणातील काही हलकेफुलके पैलूही नमूद करण्यात आले आहेत. निवेदनात एका ठिकाणी दोन्ही नेत्यांनी आइस हॉकीबाबतही चर्चा केल्याचे लिहिले आहे. हा असा विषय आहे, ज्यात रशियन नागरिकांना खूप स्वारस्य असते. पाश्चात्य जगापासून तीन वर्षे अलिप्त राहिल्यानंतर आणि त्यापूर्वीच्या कटू संबंधांच्या दीर्घ काळानंतर रशिया आता थेट अमेरिकेशी बोलत आहे. हा बदल समजून घेण्याचा प्रयत्न रशिया करीत असावा. या संभाषणात दोघांनीही मध्य पूर्वेतील शांतता आणि ‘जागतिक सुरक्षे’चा मुद्दा उपस्थित केला.
फोनवरील संभाषणापूर्वी ट्रम्प हे रशियावर किती दबाव आणू शकतील, याचा अंदाज काही लोक बांधत होते; पण पुतीन हे युद्धविरामात अडथळे निर्माण करणार असल्याचे स्पष्ट झाले होते; परंतु पंधरवड्यापूर्वी अमेरिकेतील ओव्हल ऑफिसमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी ट्रम्प यांच्या झालेल्या गरमागरम देवाणघेवाणीसारखे काहीही चिन्ह दिसत नव्हते. दोन्ही देशांच्या वक्तव्यावरून यात काहीही बदल झालेला नाही. रशियाने पुनरुच्चार केला, की त्याला शांतता हवी आहे. रशिया अशा अटी घालत आहे, की ज्यामुळे युक्रेनची प्रतिकार करण्याची क्षमता आणखी कमकुवत होईल. युक्रेनच्या मित्र राष्ट्रांकडून होणारा शस्त्रास्त्रं पुरवठा आणि गुप्तचर माहितीचा पुरवठा बंद करण्याची एक मागणी आहे.
युक्रेनच्या जनतेसाठी ही दिलासा देणारी बाब आहे, की अमेरिका सध्या अशी कोणतीही अट मान्य करत नाही. ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील दीर्घ फोन कॉलनंतर, युक्रेन आणि रशियामध्ये हवाई हल्ले झाले. झेलेन्स्की यांनी केलेल्या दाव्यानुसार रशियाने रात्री केलेल्या हल्ल्यात सुमी येथील रुग्णालयासह नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. दुसरीकडे, युक्रेनच्या हल्ल्यामुळे दक्षिण रशियातील तेल डेपोला आग लागली. त्याचे क्षेत्रफळ 20 चौरस किलोमीटर आहे. टाक्यांमधील पाइपलाइन खराब झाली. आग शमववण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे, की त्यांनी युक्रेनमधून सोडलेले 57 ड्रोन पाडले आहेत. फोन संभाषणादरम्यान पुतीन आणि ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियात प्रत्येकी 175 कैद्यांची देवाणघेवाण करण्यावर यावर सहमती झाली. काळ्या समुद्रातील जहाजांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू होईल. याशिवाय 23 गंभीर जखमी युक्रेनियन सैनिकांना युक्रेनला पाठवण्यात येणार आहे. या सैनिकांवर सध्या रशियात उपचार सुरू आहेत. 30 दिवसांच्या युद्धविरामदरम्यान युक्रेनमधील सैन्याची हालचाल थांबवावी, अशी मागणी रशियाने केली आहे.
युक्रेनमधील युद्ध तात्पुरते थांबविण्याच्या कल्पनेला पुतीन यांनी सहमती दर्शविली; परंतु त्यांनी काही प्रश्नदेखील उपस्थित केले. त्यावर त्यांना अमेरिकेशी चर्चा करायची होती. कोणत्याही युद्धविरामाने दीर्घकालीन शांतता प्रस्थापित केली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. त्याच वेळी, आपल्याला संघर्षाच्या ‘मूळ कारणां’ना सामोरे जावे लागेल. रशियाने पाश्चात्य देशांकडून सर्वसमावेशक सुरक्षा कराराची मागणी केली होती. या हमीपत्रात युक्रेनला ‘नाटो’ देशांचे सदस्यत्व न देण्याची मागणीही करण्यात आली होती. रशियन अधिकार्यांचा असा विश्वास आहे, की युक्रेनला बिनशर्त युद्धबंदीचा अधिक फायदा होईल.
रशियन सैन्य डॉनबास आणि रशियाच्या कुर्स्क या दोन्ही प्रदेशात पुढे जात आहे. युक्रेनने करार न करता युद्ध संपवले, तर पुतीन यांना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुन्हा लढाई सुरू करावी लागेल, असे त्यांनी म्हटले होते. खरे तर, जून 2024 मध्ये पुतीन यांनी युद्धविरामासाठी त्यांच्या मुख्य अटी सांगितल्या होत्या. या परिस्थितीत, त्यांनी युक्रेनने लुहान्स्क, डोनेस्तक, खेरसन आणि झापोरिझिया प्रदेशातून आपले सैन्य मागे घेण्याची मागणी केली. यापैकी फक्त काही भाग आता रशियाच्या ताब्यात आहेत. याव्यतिरिक्त, युक्रेनला ‘नाटो’मध्ये सामील होण्यास बंदी घालण्यात यावी आणि रशियावरील निर्बंध उठवावेत अशी मागणी त्यांनी केली; प
रंतु यापैकी कोणतीही अट सौदी अरेबियात झालेल्या युद्धबंदी कराराचा भाग नव्हती. याउलट, युक्रेनबरोबर अमेरिकेचा शस्त्र पुरवठा आणि गोपनीय माहितीची देवाण पुन्हा सुरू केल्याने पुतीन अस्वस्थ झाले आहेत. युक्रेनला लष्करी मदत देणे हे शत्रुत्व सुरू ठेवण्याचे एक कारण आहे, असा युक्तिवाद पुतीन यांनी वारंवार केला आहे.
दरम्यान, झेलेन्स्की हे लष्करी मदतीच्या वाटाघाटी करण्यासाठी फिनलँडला गेले होते. संरक्षण मदतीव्यतिरिक्त, युक्रेनमधील शस्त्रास्त्र उत्पादनातील गुंतवणूक आणि युक्रेनचा युरोपमध्ये प्रवेश हा या बैठकीचा मुख्य अजेंडा होता. याचा अर्थ अमेरिकेवर अवलंबून न राहता युरोपीय देशातून अधिकाधिक मदत कशी मिळेल, यावर त्यांचा भर आहे. नवनव्या डावपेचामुळे आता युद्धविराम कसा होणार, हा प्रश्नच आहे.





