रूपगंध : महान शिल्पकाराचा ‘महा’सन्मान

– डॉ. जयदेवी पवार
धुळे जिल्ह्यातील एका लहानशा गावात जन्मलेले राम सुतार हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील महान शिल्पकार म्हणून ओळखले जातात. यांच्या शिल्पकलेत सजीवतेची अनुभूती असते. त्यांच्या मूर्तींमध्ये बारकावे, हावभाव आणि सौंदर्य यांचा उत्तम संगम दिसून येतो. ते पारंपरिक आणि आधुनिक तंत्रांचा उत्कृष्ट समन्वय साधतात. त्यांची शिल्पे केवळ भव्यदिव्य नसून त्यामध्ये ऐतिहासिक संदर्भ, सांस्कृतिक जाणीव आणि अभिव्यक्ती यांचा अद्वितीय समतोल असतो. त्यांनी साकारलेली असंख्य भव्यदिव्य शिल्पे आज देशाच्या विविध ठिकाणी इतिहास आणि परंपरेचे प्रतीक बनून उभी आहेत. वयाच्या शंभरीच्या टप्प्यावर असणार्या या महान शिल्पकाराला यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे, ही केवळ शिल्पकलाप्रेमींसाठीच नव्हे तर समस्त मराठीजनांसाठी अभिमानाची घटना होय.
शिल्पकला ही मानवी सृजनशीलतेचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. दगड, धातू, लाकूड, माती आणि विविध माध्यमांतून शिल्पकार आपल्या भावनांना, कल्पनांना आणि संस्कृतीला मूर्त रूप देतात. ही कला केवळ सौंदर्यनिर्मितीपुरती मर्यादित नसून ती इतिहास, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे प्रतिबिंबही असते. अजिंठा-वेरुळची लेणी, मोहेनजोदारो-हरप्पा संस्कृतीतील शिल्पे, भारतीय मंदिरशिल्पे आणि आधुनिक काळातील भव्य पुतळे यामधून भारतीय शिल्पकलेची आणि शिल्पकारांच्या प्रतिभेची प्रचिती येते. प्राचीन भारतीय मंदिरांवरील शिल्पे तत्कालीन जीवनशैली, धर्म आणि अध्यात्म यांचे उत्कृष्ट दर्शन घडवतात. राम सुतार हे भारताच्या शिल्पकलेतील एक थोर आणि अष्टपैलू कलाकार आहेत. त्यांचे योगदान भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांनी साकारलेली असंख्य भव्यदिव्य शिल्पे आज देशाच्या विविध ठिकाणी इतिहास आणि परंपरेचे प्रतीक बनून उभी आहेत. वयाच्या शंभरीच्या टप्प्यावर असणार्या या महान शिल्पकाराला यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. ही केवळ शिल्पकलाप्रेमींसाठीच नव्हे तर समस्त मराठीजनांसाठी अभिमानाची घटना होय.
1925 मध्ये महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गुंदूर गावात राम सुतार यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना कलाविषयक विशेष आवड होती. आपल्यातील कलागुणांना योग्य दिशा मिळावी म्हणून त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑङ्ग आर्टमधून शिल्पकलेचे औपचारिक शिक्षण घेतले. या ठिकाणी त्यांनी शिल्पकलेतील बारकावे आत्मसात केले आणि पुढे भारतीय शिल्पकलेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनले. राम सुतार यांनी भारतीय इतिहासातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांची शिल्पे साकारली आहेत. त्यांचे बहुतेक शिल्पकलेतील कार्य हे देशप्रेम, सामाजिक सुधारणा आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणारे आहे. त्यांनी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महापुरुषांची भव्य शिल्पे तयार केली.
1954 ते 1958 मध्ये अजिंठा आणि वेरुळ येथील संवर्धनाच्या कामात योगदान सुतार यांनी दिले होते. मध्य प्रदेशात एका दगडातून त्यांनी चंबळ स्मारकाची निर्मिती केली. भाक्रा नांगल धरणाची निर्मिती करणार्या मजुरांच्या सन्मानासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 50 ङ्गुट उंचीचा कामगारांचा पुतळा उभारण्याचं काम सुतार यांना दिले होते. तो पुतळा 16 जानेवारी 1959 ला बसवण्यात आला होता. गुजरातमधील 182 मीटर ऊंच असणारी श्रीरामाची मूर्ती, दिल्लीतील 10 ङ्गुटांचे गोविंद वल्लभ पंत यांचे कास्य शिल्प, बिहारमधील कर्पुरी ठाकूर, अनुग्रह नारायण सिन्हा, अमृतसरमधील महाराजा रणजीत सिंह यांचा पुतळा राम सुतार यांनी बनवलेला आहे.
बालवयापासूनच राम सुतार यांच्यावर महात्मा गांधी यांचा प्रभाव आहे. शाळेत असताना महात्मा गांधी यांचं स्मितहास्य करतानाचं चित्र काढल्याचं सुतार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. पुढे त्यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेला महात्मा गांधींचा अर्धपुतळा जगभरात अतिशय लोकप्रिय ठरला आहे. ङ्ग्रान्स, अमेरिका, इटली, अर्जेंटिना, बार्बाडोस, रशिया, इंग्लंड, मलेशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, चीन, दक्षिण आङ्ग्रिका, इजिप्त, पोलंड अशा 450 हून अधिक शहरांमध्ये हा अर्धपुतळा स्थापित करण्यात आला आहे. या कलेच्या अत्युच्च दर्जामुळेच राम सुतार यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली आहे. भारतातील आणि जगभरातील अनेक कलाकारांनी त्यांच्या स्टुडिओला भेट देऊन त्यांच्या शिल्पकलेच्या तंत्रांचा अभ्यास केला आहे. काही तज्ञांनी त्यांची तुलना मायकेलँजेलो आणि ऑगस्टे रॉदिन यांसारख्या जागतिक स्तरावरील शिल्पकारांशी केली आहे. त्यांच्या कलेतील बारकावे, सौंदर्य आणि वास्तववाद यामुळे ते जागतिक शिल्पकलेच्या क्षेत्रात एक देदीप्यमान शिल्पकार ठरले आहेत.
राम सुतार यांचे सर्वात प्रसिद्ध आणि भव्य शिल्प म्हणजे ‘स्टॅच्यू ऑङ्ग युनिटी’, जे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ उभारले गेले आहे. हा पुतळागुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे. हा जगातील सर्वांत उंच पुतळा असून त्याची उंची 182 मीटर आहे. हे शिल्प त्यांच्या कलेची आणि कौशल्याची परिसीमा आहे. लहानपणापासून राम सुतार यांना जगातील सर्वात मोठे शिल्प घडवण्याची इच्छा होती. स्टॅच्यू ऑङ्ग लिबर्टीच्या चित्रांनी प्रेरित होत त्यांनी ही महत्त्वाकांक्षा बाळगली. अखेर त्यांचे हे स्वप्न 522 ङ्गूट उंच ‘स्टॅच्यू ऑङ्ग युनिटी’च्या रूपाने पूर्ण झाले.
राम सुतार यांच्या शिल्पकलेत सजीवतेची अनुभूती असते. त्यांच्या मूर्तींमध्ये बारकावे, हावभाव आणि सौंदर्य यांचा उत्तम संगम दिसून येतो. ते पारंपरिक आणि आधुनिक तंत्रांचा उत्कृष्ट समन्वय साधतात. त्यांची शिल्पे केवळ भव्यदिव्य नसून त्यामध्ये ऐतिहासिक संदर्भ, सांस्कृतिक जाणीव आणि अभिव्यक्ती यांचा अद्वितीय संगम असतो. त्यांनी अनेक देशांमध्ये आपल्या शिल्पकलेचा ठसा उमटवला आहे.
राम सुतार आणि त्यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्या नेतृत्वाखाली राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. आणि राम सुतार ङ्गाइन आर्ट्स प्रा. लि. या कंपन्या आज भारतातील सर्वात मोठ्या शिल्पनिर्मिती संस्थांपैकी एक ठरल्या आहेत. नोएडाच्या इलेक्ट्रॉनिक सिटी येथे 12,000 चौ.ङ्गूट क्षेत्रङ्गळावर त्यांचा विस्तीर्ण स्टुडिओ कार्यरत आहे. साहिबाबाद, गाझियाबाद येथे भारतातील सर्वांत मोठे ङ्गाउंड्री सेटअप आहे. येथे 80,000 चौ.ङ्गूट क्षेत्रङ्गळाच्या कारखान्यात दररोज 10,000 किलो धातूचे कास्टिंग करण्याची क्षमता आहे. या संस्थांमध्ये जर्मनीतील कुका रोबोट तंत्रज्ञान, अत्याधुनिक सीएनसी मशीन आणि अन्य आधुनिक अभियांत्रिकी सुविधा वापरल्या जातात. यामुळे शिल्पनिर्मितीमध्ये अचूकता आणि भव्यता साधली जाते.
राम सुतार हे केवळ एक शिल्पकार नसून भारताच्या संस्कृतीचे आणि इतिहासाचे जिवंत रूप आहेत. त्यांची शिल्पे भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहेत. त्यांच्या कलेमधून भारतीय परंपरा, देशप्रेम आणि ऐतिहासिक जाणीव प्रतिबिंबित होते. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे ते भारतीय शिल्पकलेतील एक अमूल्य ठेवा मानले जातात. राम सुतार यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 1999 मध्ये राम सुतार यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता. याशिवाय बॉम्बे आर्टस सोसायटीकडून त्यांना 3 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य कला परिषद नवी दिल्ली यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यादृष्टीने विचार करता महाराष्ट्र भूषण त्यांना खूप उशिरा देण्यात आला, असे म्हणावे लागेल. पण उशिरा का होईना,त्यांच्या कार्याची यथोचित दखल घेतली गेली, याबद्दल राज्य सरकारचेही अभिनंदन करावयास हवे.





