ICC Test Rankings : आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर, हॅरी ब्रूकने घेतली मोठी झेप तर रोहित शर्माला बसला फटका…

ICC MEN’S TEST BATTING RANKINGS :- इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने मोठी झेप घेत तिसरे स्थान काबीज केले आहे. ज्यामुळे, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला थोडासा फटका बसला आहे. मात्र, यानंतरही भारताचे तीन फलंदाज टॉप-10 मध्ये आपले स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत.
आयसीसी कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सध्या त्याचे रेटिंग पॉइंट 859 आहेत. मात्र, आता त्याचे अव्वल स्थान धोक्यात आल्याचे दिसत आहे. इंग्लंडचा जो रूट त्याच्या अगदी जवळ आला आहे. ब्रुकने चार स्थानांची झेप घेतली असून, आता त्याचे रेटिंग पॉइंट 771 वर पोहोचले आहे. ब्रूकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले होते, त्याचा फायदा त्याला यावेळी क्रमवारीत होताना दिसत आहे. ब्रूकने चार स्थानांनी झेप घेतल्याने पाकिस्तानच्या बाबर आझमसह एकूण चार फलंदाजांना आपापल्या स्थानावरून एक स्थान घसरावे लागले आहे.
पाकिस्तानचा बाबर आझम आता 768 रेटिंग पॉइंटसह एका स्थानाच्या नुकसानासह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलचेही 768 रेटिंग पॉइंट आहेत. त्यामुळे तोही बाबरसह संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथलाही एका स्थानाचा फटका बसला आहे. आता तो 757 रेटिंग पॉइंटसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माचीही एका स्थानाने घसरण झाली आहे. त्याचे रेटिंग पॉइंट 751 असून तो सातव्या क्रमांकावर गेला आहे.
जैस्वाल-कोहली टॉप-10 मध्ये कायम
बुक्रच्या झेपीचा यशस्वी जैस्वाल व विराट कोहलीच्या क्रमवारीवर परिणाम झालेला नाही. जैस्वाल 740 रेटिंग पॉइंटसह आठव्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेचा दामुथ करुणारत्ने 739 रेटिंगसह नवव्या क्रमांकावर कायम आहे. टॉप-10 मध्ये भारताचा विराट कोहली शेवटच्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग अजूनही 737 आहेत.





