मुंबई : एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा दोन वर्ष दूर आहे. त्यावेळेस रोहित शर्मा 40 वर्षांचा असेल आणि विराट कोहलीही चाळीशीच्या आसपास असेल. दोघांनाही विस्वकरंडक खेळायची इच्छा आहे. मात्र, रोहितची सध्याची तंदुरुस्ती पाहता त्याचा या स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे येत्या काळात त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय संघ व्यवस्थापनाचे आणि निवड समितीचे वेगळे नियोजन सुरु आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकरांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट निवड समितीच्या भविष्यातील योजनांमध्ये या दोघांपैकी रोहितला जागा नसल्याचे संकेत मिळत आहेत. विराट हा रोहितपेक्षा शारीरिकदृष्ट्या अधिक चपळ असून अजूनही त्याचा फॉर्म उत्तम आहे. त्याची फलंदाजीही उत्तम असल्याने रोहितच्या तुलनेत विराट 2027 चा विश्वकरंडक खेळण्याची शक्यता अधिक आहे. रोहितसाठी 2027 सालचा विश्वकरंडक खेळणे अत्यंत कठीण मानले जात आहे. रोहित शर्माच्या खेळामध्ये आता फार बदल दिसून येतो. रोहित संघाला आक्रमक सुरुवात करून देतो. तो क्रीजवर येताच लांब आणि मोठे फटके खेळतो आणि त्याच्या आक्रमकतेने संघाला एक उत्तम सुरुवात करून देतो. पण सध्या रोहितचे वाढते वय आणि त्याचा फॉर्म पाहता तो हे आणखी किती काळ करू शकतो यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच प्रमाणे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरही कर्णधार असेल की नसेल यात शंका आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये रोहितला कर्णधारपदासंदर्भातील कारभार पेलवणार नाही असे सांगितले जात आहे. सामान्यपणे आताचा कर्णधार निवृत्त होताना पुढील कर्णधार कोण असेल हे बीसीसीआय ठरवते आणि त्यानंतर निश्चित कर्णधार पुढील धुरा संभाळण्यासाठी ठरवला जातो. उदाहरणार्थ धोनीला तो 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर खेळणार नाही हे ठाऊक असल्याने 2017 मध्ये विराट कोहलीकडे एकदिवसीय सामन्यांचे नेतृत्व सोपवण्यात आले. असाच काहीसा प्रकार रोहितसोबत होईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे रोहित 2027 चा विश्वकरंडक खेळला तरी तो कर्णधार म्हणून नक्कीच हा विश्वकरंडक खेळणार नाही. एकीकडे आयपीएलचा थरार रंगला होता त्यावेळी रोहित आणि विराटने चाहत्यांना आणि दिग्गजांना कसोटीतून निवृत्तीची घोषणा करून धक्का दिला. त्यांच्या या निर्णयाने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली होती आणि नंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात आले. पण त्यांनी खरंच स्वइच्छेने निवृत्ती घेतली की त्यांना भाग पाडण्यात आले हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अजित आगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील नव्या धोरणांनुसार भारताचे सध्या तीन कर्णधार आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित, टी-20 मध्ये सूर्यकुमार यादव आणि आता कसोटी क्रिकेटसाठी शुभमन गिलची नियुक्ती कर्णधार म्हणून करण्यात आली आहे. मात्र ही परिस्थिती फार काळ राहील असे वाटत नाही. आम्हाला असे वाटलेलं की चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटपासून दूर जाईल, निवृत्त होईल. रोहितच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भवितव्याबद्दल त्याच्यात आणि बीसीसीआयमध्ये काहीही चर्चा झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्माने आपण एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नसल्याचे सांगितलेले. मात्र भविष्याचा विचार करुन कर्णधारपदाच्या जबाबदाऱ्या सोपवण्याबद्दल अजित आगरकर ठाम असल्याचे समजते. त्यांच्या योजनेत रोहितला कर्णधार म्हणून स्थान नसल्याची सूत्रांची माहिती आहे.