Rohit Sharma Record : हिटमॅनची IPL 2026 मध्ये दमदार सुरुवात! किंग कोहलीला ‘या’ बाबतीत टाकलं मागे
Rohit Sharma Record : रोहित शर्माने एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घालत विराट कोहलीला मागे टाकले आहे.

Rohit Sharma Record vs KKR IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात भारतीय क्रिकेटचे दोन आधारस्तंभ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील ‘रन्स वॉर’ने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) खेळताना रोहित शर्माने एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घालत विराट कोहलीला मागे टाकले आहे.
रोहित शर्माने वानखेडेवर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. रोहितने अवघ्या ३८ चेंडूत ७८ धावांची वादळी खेळी केली, ज्यामध्ये ६ चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावर रोहितने आयपीएलच्या इतिहासात एका विशिष्ट संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
विराट कोहली दुसऱ्या स्थानावर –
रोहित शर्माने आता कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एकूण ११६१ धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला. विराटने पंजाब किंग्सविरुद्ध ११५९ धावा केल्या होत्या. आता रोहित या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
Rohit Sharma now holds the record for scoring the most runs against a single opponent in IPL history! 💙🔥#IPL2026 #RohitSharma #MIvKKR #Sportskeeda pic.twitter.com/lQaZFSXVeR
— Sportskeeda (@Sportskeeda) March 30, 2026
एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा:
- रोहित शर्मा: ११६१ धावा (बनाम केकेआर)
- विराट कोहली: ११५९ धावा (बनाम पंजाब किंग्स)
- विराट कोहली: ११४६ धावा (बनाम सीएसके)
कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक –
या सामन्यात रोहितने केवळ २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. विशेष म्हणजे, पॉवरप्लेमध्ये अर्धशतक ठोकण्याची रोहितची ही पहिलीच वेळ आहे. या ५० पेक्षा जास्त धावांच्या खेळीसह रोहित आयपीएलमध्ये ५० वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा चौथा फलंदाज बनला आहे. या यादीत विराट कोहली (७२), डेव्हिड वॉर्नर (६६) आणि शिखर धवन (५३) त्याच्या पुढे आहेत.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरचा ६ विकेट्सनी पराभव केला. यासह मुंबई इंडियन्सने १४ वर्षानंतर पहिल्यांदाच सलामीच्या सामन्यात विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे. तसेच ‘हिटमॅन’च्या या फॉर्ममुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आगामी सामन्यांत रोहित आणि विराट यांच्यातील ही विक्रमांची लढाई अधिक रंजक होणार आहे.





