Rohit Sharma Record : रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला मागे टाकत जागतिक विक्रमाला घातली गवसणी
Rohit Sharma Record : रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन षटकार ठोकून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

Rohit Sharma Breaks Shahid Afridi Record Most Sixes Against NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितने दुसऱ्या सामन्यात २३ धावांची खेळी केली. या छोट्या खेळीत त्याने मारलेल्या दोन गगनचुंबी षटकारांच्या जोरावर न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील अव्वल फलंदाज बनला आहे. या कामगिरीसह त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा ५० षटकारांचा विक्रम मोडला.
५१ षटकारांसह आफ्रिदीला टाकले मागे; ख्रिस गेल तिसऱ्या स्थानी
वेलिंग्टन सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या नावावर न्यूझीलंडविरुद्ध ४९ षटकार होते. या डावात दोन षटकार ठोकताच त्याच्या नावावर ५१ षटकारांची नोंद झाली. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता, ज्याने किवी संघाविरुद्ध ५० षटकार ठोकले होते. आता रोहितने आफ्रिदीला मागे टाकत अव्वल स्थान काबीज केले आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल ४५ षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तीन वेगवेगळ्या संघांविरुद्ध ५०+ षटकार; जागतिक विक्रमाची बरोबरी
ROHIT SHARMA COMPLETED 50 SIXES vs NEW ZEALAND IN ODIs 🔥🇮🇳
– The Greatest six hitter ever. https://t.co/I7ad6Mdmze
— Johns. (@CricCrazyJohns) November 7, 2026
या विक्रमासोबतच ‘हिटमॅन’ने आणखी एका मोठ्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तीन वेगवेगळ्या संघांविरुद्ध ५० किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा रोहित हा जगातील केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम केवळ शाहिद आफ्रिदीच्याच नावावर होता. रोहितने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी ९३ आणि श्रीलंकेविरुद्ध ५८ षटकार ठोकले आहेत; आता न्यूझीलंडविरुद्धही त्याने हा पन्नास षटकारांचा टप्पा यशस्वीरीत्या ओलांडला आहे.
एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकारांमध्ये रोहितचे वर्चस्व –
BREAKING NEWS 🚨
ROHIT SHARMA BREAKS A MAJOR
RECORD HELD BY SHAHID AFRIDI.🚨
By hitting 51 sixes in ODIs against New Zealand, Rohit Sharma has surpassed former Pakistan captain Shahid Afridi (50 sixes).
Rohit now holds the new record for the most sixes hit in ODIs against the Kiwi side.
— IndiaTeamhub (@vivek23mishra) November 7, 2026
एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका विशिष्ट संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीतही रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे ९३ षटकार हे जागतिक विक्रमात पहिल्या स्थानी आहेत, तर इंग्लंडविरुद्ध ख्रिस गेलचे ८५ षटकार दुसऱ्या स्थानी आहेत. श्रीलंकेविरुद्ध आफ्रिदीने ६३ आणि रोहितने ५८ षटकार मारले आहेत. अवघ्या २३ धावांच्या खेळीतही दोन ऐतिहासिक विक्रमांना स्पर्श करत रोहितने पुन्हा एकदा आपल्या षटकारांच्या बादशाहतीची प्रचिती दिली आहे.





