Rohit Pawar : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. हा अपघात होता की घातपात, याबाबत चौकशीची मागणी होत असतानाच आता आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर थेट सवाल उपस्थित करत नवा वाद निर्माण केला आहे. बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पवार कुटुंबीयांकडून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी ज्या कंपनीचे विमान होते त्या VSR Aviation कंपनीवर संशय व्यक्त केला आहे. रोहित पवारांचा सोशल मीडियावर सवाल रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रफुल्ल पटेल यांना थेट प्रश्न विचारले आहेत. त्यांनी म्हटले की, VSR कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्या राजस्थानमध्ये झालेल्या लग्नाला आपण उपस्थित होता का? तसेच त्या लग्नात आणखी कोणते नेते उपस्थित होते आणि ते कोणत्या पक्षाचे होते, याची माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. “तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी, हे महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्यावे,” असे आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे. ‘एव्हिएशन क्षेत्रातील संपर्कांचा’ही उल्लेख यापूर्वीही रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नागरी उड्डाण मंत्रालयातील प्रभावी संपर्कांचा उल्लेख केला होता. जर त्यांनी या प्रकरणात मदत करून पुरावे गोळा करण्यास सहकार्य केले असते, तर चौकशीला मदत झाली असती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.