Rohit Pawar : राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे फोन टॅप केले जात आहेत; रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

मुंबई : महायुती सरकारला स्थापन होऊन आता केवळ सात महिने होत आहेत पण या सात महिन्यांमध्ये अनेक नेत्यांवर विविध प्रकारचे आरोप झाले आहेत. यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट करत दावा केला आहे. काही मंत्र्यांचे फोन ब-याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वत:हूनच फोन बंद ठेवतात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. बघूया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच..!, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रोहित पवारांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आरोप करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. कोणीही काहीही आरोप करू शकतात. परंतु आरोप करणाऱ्यांनी काही पुरावे दिले पाहिजे. आरोप करायचे आणि पुरावे काहीच द्यायचे नाहीत. काहीतरी दाखवले पाहिजे. त्या आरोपामध्ये काहीतरी तथ्य, पुरावा काहीतरी पाहिजे, असे म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांच्या ट्वीटवर भाष्य केले आहे.




