‘उघडी-नागडी पडलेली महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था…’, लातूरमधील अमानुष मारहाणीच्या घटनेवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

Rohit Pawar on Latur Crime | राज्यात एकामागोमाग एक गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता लातूरमधूनही भयानक घटना समोर आली आहे. 4-5 जणांच्या टोळक्याने भररस्त्यात एका तरूणाला दगड, काठी व बेल्टने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लातूरमधील या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राज्यात कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रालयातील कोटवाल्यांना या घटना दिसणार आहेत की नाही? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.
भर रस्त्यात निपचित उघडी~नागडी पडलेली महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था मंत्रालयातील कोटवाल्यांना दिसेल का? आणि राज्यातील गुन्हेगारीच्या भस्मासुराचा वध होऊन सामान्य माणसाचं जगणं निर्भय होईल का?
पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली, तेवढाच दिलासा…! pic.twitter.com/KsKyFwFdFj
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 12, 2025
लातूरमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हीडिओ शेअर करत रोहित पवार म्हणाले की, भर रस्त्यात निपचित उघडी-नागडी पडलेली महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था मंत्रालयातील कोटवाल्यांना दिसेल का? आणि राज्यातील गुन्हेगारीच्या भस्मासुराचा वध होऊन सामान्य माणसाचं जगणं निर्भय होईल का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली, तेवढाच दिलासा…!, असेही ते म्हणाले.
नक्की घटना काय?
लातूरमध्ये 4 ते 5 गुंडांनी एका तरूणाला भररस्त्यात दगड व बेल्टने मारहाण केल्याचा धक्कादायक व्हीडिओ समोर आला आहे. लातूरमधील आंबेजोगाई रोडवरील एका बारमध्ये हे गुंड दारू पीत बसले होते. त्यावेळी त्यांच्यात भांडण सुरू झाले. त्यानंतर सर्वजण रोडवर आले. 4 ते 5 जणांनी भररस्त्यात तरूणाला अमानुषपणे मारहाण केली. दरम्यान, या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, चोप देत त्यांची धिंड देखील काढण्यात आली.
हा व्हिडिओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेलीय…
कोणताही माणूस असू द्या क्षणात विचार करेल अरे सुरू काय आहे महाराष्ट्रात…..
आवरा ह्यांना …..एखाद दिवशी यंत्रणेलाच आव्हान देतील हे …
सावध व्हा आणि कारवाई करा
चांगले पी.पी द्या कोर्टात उगाच नावाला कारवाई करू नका @LaturPolice pic.twitter.com/6g0YLbfjtA— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 11, 2025
या घटनेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा व्हिडिओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. कोणताही माणूस असू द्या, क्षणात विचार करेल अरे सुरू काय आहे महाराष्ट्रात. आवरा ह्यांना. एखाद्या दिवशी यंत्रणेलाच आव्हान देतील हे. सावध व्हा आणि कारवाई करा.’ अशी मागणी आव्हाड यांनी केली.




