ही रोहित पवारांची वृत्ती, त्याला सहआरोपी करा; गोपीचंद पाडळकरांची मागणी

मुंबई : मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात शरद पवार गटाचा हात असून रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख आरोपीच्या संपर्कात होते.
त्यांच्याकडून आरोपीला फोन केला जात होता, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. अशातच आता आमदार गोपिचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, रोहित पवार यांनी माझ्यावर हल्ला घडवून आणला होता असा आरोप करत त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
गोपीचंद पडळकर म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी माझ्यावर हल्ला घडवून आणला होता असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच रोहित पवार यांना सहआरोपी करा, अशी मागणी देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. वर्षभरापूर्वी माझ्याकडे एक व्यक्ती आला त्यांनी मला सांगितले की रोहित पवार, सुप्रिया सुळे तुमच्याविरोधात षडयंत्र रचत आहे.
गोपीचंद पडळकर यांना धनगरांचा विरोध आहे हे दाखवण्यासाठी धनगर पोरांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवाभाऊंना मी विनंती करतो की, महादेव देवकाते यांच्याबरोबर रोहित पवार यांना माझ्यागाडीवर जो 2021 मध्ये हल्ला झाला त्या हल्याचा फेरतपास करत आरोपी केले पाहिजे, असे ते म्हणाले.
ही रोहित पवारांची वृत्ती
पुढे बोलताना म्हणाले की, माझ्या जवळच्या मुलांना सांगितले जात आहे की गोपीचंदवर हल्ला करा, त्यांच्याविरोधात व्हिडिओ करा, त्यांच्याविरोधात पोस्ट करा. माझ्याविरोधातील सर्व पोस्ट रोहित पवारांनी करायला सांगितल्या. जयंतीच्या कार्यक्रमात जाऊन दंगे करा, धनगर सामाजाच्या कार्यक्रमात गोंधळ घाला ही रोहित पवारांची वृत्ती आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रोहित पवारांबद्दल माहिती पुढे आणली. तुझे तोंड आता बंद झाले. आजोबाचा विषय हा पुढे चालवत आहे. जयकुमार गोरे प्रकरणी या तिघांना सहआरोपी करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तर सोलापुरात माझ्यागाडीवर जो हल्ला झाला त्यावर ह्या व्यक्तीचे स्टेटमेंट घेत रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.
याप्रकरणाची चौकशी केली जाणार : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली घटना दुदैवी आहे. कुणाला जीवनातून उठवण्याच्या उद्देशाने राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे. पोलीस तपासात असं निदर्शनास आले की हे एक नेक्सस होतं. ही महिला, युट्युबर तुषार खरात आणि अनिल सुभेदारसह काही लोकांचा नेक्सस असल्याचे आढळले. या लोकांनी जो कट रचला याचे सगळे पुरावे सापडले आहेत. यांचे अनेक फोन आहेत, ते सगळे सापडले आहेत.
दुदैवाची गोष्ट म्हणजे या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते थेट संपर्कात दिसत आहेत. प्रभाकरराव देशमुख यांच्याशी आरोपी बोलत होते. त्याहीपेक्षा वाईट वाटते की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातसोबत झाले आहेत. तसेच आरोपींनी तयार केलेले व्हिडीओ देखील त्यांना पाठवण्यात आले आहेत. आता याची चौकशी केली जाणार आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.




