घराणेशाहीच्या आरोपावर रोहित पवार स्पष्टच बोलले ; म्हणाले,”अजित पवारांचे कुटुंब आता वेगळं”

Rohit Pawar on Dynasty । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर बारामती लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा देशभरात झाली. बारामतीच्या राजकारणात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडलेले आहेत. त्यासोबतच पवार कुटुंब दोन कुटुंबात विभागले गेले असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत बोलताना आम्ही कुटुंब म्हणून एक असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी चक्क “अजित पवार यांचं कुटुंब आता वेगळं आहे”, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडालीय.
आता अजित पवारांचं कुटुंब वेगळं Rohit Pawar on Dynasty ।
सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. यावर बोलताना रोहित पवारांनी म्हटलं की, “अजित पवारांनी तो निर्णय का घेतला? राजकीय दृष्टीकोणातून तो चुकीचा दिसत असला तरी त्यांच्या पक्षामधील काही आमदार आणि नेते कुठेतरी काहीतरी कुजबुज करत असतील. कारण त्यांचा कोणावरच विश्वास नसल्यामुळे त्यांनी घरच्या व्यक्तीला ते पद देण्याचा निर्णय घेतला असेल. कारण अजित पवारांचा कोणावरही विश्वास नसेल. आता अजित पवारांचं कुटुंब वेगळं आहे आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील कुटुंब वेगळं आहे”, असे रोहित पवार स्पष्टच बोलून गेले.
त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात घराणेशाही Rohit Pawar on Dynasty ।
बारामतीमध्ये पवार कुटुंबात तीन खासदार आहेत. तसेत दोन आमदार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबावर घराणेशाहीची टीका होत आहे, या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “आता टीका करणारे लोक कोण आहेत? टीका करणारी व्यक्ती फक्त नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आहेत. नरेंद्र मोदी एका बाजूला घराणेशाहीवर टीका करतात आणि दुसरीकडे अनेक कुटुंबांना फोडून नेते स्वत:कडे घेत आहेत. यामध्ये विखे पाटील कुटुंब, पवार कुटुंब, मुंडे कुटुंब असे अनेक कुटुंब आपल्याला दिसतील. सर्वात जास्त घराणेशाही नेते कोणाकडे असतील तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. घराणेशाहीचा विषय तेच काढतात आणि नेत्यांनाही तेच घेतात. त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे”, अशी टीका रोहित पवारांनी भाजपावर केली.





