Rohit Pawar : जामखेडच्या तहसीलदारांची गडचिरोलीला बदली; आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप

जामखेड : जामखेड तालुक्याचे तहसीलदार गणेश माळी यांची गडचिरोली येथे बदली झाल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी निघालेल्या या बदलीच्या आदेशानंतर तहसीलदार माळी यांना धानोरा (जि. गडचिरोली) येथे पाठवण्यात आले आहे. अवघ्या एका वर्षात या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीदरम्यान गट रचनेत विशिष्ट गावांचा समावेश करण्याचा सत्ताधारी गटाचा आदेश तहसीलदार माळी यांनी नियमांचे पालन करत नाकारला. यामुळे नाराज झालेल्या सत्ताधारी नेत्याने त्यांची बदली केल्याचा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.
जामखेड तालुक्यात साकत, खर्डा आणि जवळा असे तीन गट असून, काही गावांचा दुसऱ्या गटात समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा दबाव होता. मात्र, तहसीलदार माळी यांनी नियमांचा आदर करत हा आदेश मान्य केला नाही. यावरून एका वजनदार नेत्याने त्यांच्यावर फाइल फेकल्याची चर्चाही आहे. सत्ताधारी गट नेहमीच आपल्या सोयीने गट रचना करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याच कारणामुळे तहसीलदार माळी यांची गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात बदली झाल्याचे मानले जात आहे.
आमदार रोहित पवार यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत, सत्तेचा गैरवापर करून प्रामाणिक अधिकाऱ्याला शिक्षा म्हणून ही बदली केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत, “जिल्हा परिषदेच्या गट रचनेत राजकीय सोयीनुसार गावांचा समावेश करण्याचा हट्ट तहसीलदारांनी मानला नाही, म्हणून अहंकारी नेत्याने त्यांना गडचिरोलीला पाठवले. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या नेत्यांना क्षणिक समाधान मिळेल, पण याचा प्रशासनावर विपरित परिणाम होईल. प्रामाणिक अधिकाऱ्यांना अशी शिक्षा मिळत असेल, तर त्यांनी सत्ताधाऱ्यांचे बाहुले बनावे का? नव्या तहसीलदारांकडून गट रचनेत अपेक्षित बदल होतात का, याकडे आमचे लक्ष आहे,” असे म्हटले आहे.
हाती सत्ता असल्याने काही नेत्यांना अहंकाराची बाधा झाली आहे. मग नियमात नसलेल्या कामासाठीही अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असून नियमबाह्य आदेशाचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याची दुर्गम भागात बदली केली जाते. वास्तविक प्रामाणिक अधिकारी असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाची शिक्षा मिळत असेल तर त्यांच्याकडून चांगल्या कामाची कशी अपेक्षा करता येईल? त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर यावं अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही.’’
रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)




