Rohit Pawar : पोलिसांशी पंगा घेणं पडलं महागात ! रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्टेशनात पोलिसांशी गैरवर्तन आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल झाला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर हल्ला आणि त्यांच्या अटकेनंतर पक्ष आक्रमक झाला होता. यानंतर रोहित पवार यांनी पोलिसांशी वाद घालताना संयम गमावला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे प्रकरण?
नितीन देशमुख यांना अटक झाल्याने संतप्त झालेले रोहित पवार आझाद मैदान पोलीस स्टेशनात पोहोचले. तिथे त्यांचा पोलिसांशी वाद झाला. व्हायरल व्हिडीओत पवार पोलिसांना, “हातवारे करू नका, शहाणपणा करू नका आणि आवाज चढवू नका,” असे म्हणताना दिसत आहेत. या वादात इतरांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.
रोहित पवार यांचे स्पष्टीकरण
रोहित पवार यांनी व्हिडीओद्वारे स्पष्ट केले की, मकोकाचे आरोप असलेल्या गुंडांना अटक न करता पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक केली. देशमुख यांची दोन महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली असून, त्यांना मारहाण झाल्याने त्यांची भेट घेण्यासाठी पवार यांनी पोलिसांकडे मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी तीन-चार तास वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवर फेऱ्या मारायला लावत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपण संतापलो, असे पवार यांनी सांगितले.





