Rohit Pawar : महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. २८ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मुंबई ते बारामती या मार्गावर घडली. ज्यात बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक नियंत्रण सुटले आणि विमान जमिनीवर धडकले. क्षणार्धात विमानात मोठा स्फोट झाला आणि त्याला आग लागली. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, अनेकांकडून या घटनेवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. विशेषतः राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघाताबाबत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी विमानातील अतिरिक्त इंधन, अपघातानंतर डॅमेज झालेला ब्लॅक बॉक्स आणि अपघाताच्या चौकशीत होणाऱ्या विलंबावरून तीव्र शंका व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, हे मुद्दे अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात अडथळा निर्माण करत आहेत. Rohit Pawar ते पुढे म्हणाले की, ब्लॅक बॉक्स हा विमान अपघाताच्या चौकशीचा मुख्य भाग असतो, पण त्याचा डेटा मिळवण्यात उशीर होत असल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी अपघाताच्या चौकशीसाठी पारदर्शक आणि निष्पक्ष यंत्रणा उभी करण्याची मागणी केली, ज्यात देशाबाहेरील एजन्सींची मदत घेण्याचा सल्लाही दिला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, रोहित पवारांनी विमान कंपनी VSR वेंचर्सच्या भूमिकेवरही बोट ठेवले, ज्यात कंपनीच्या मालकांचे राजकीय संबंध आणि विमानाची स्थिती याबाबत शंका उपस्थित केल्या. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दाही चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या मुद्द्यावरून अनेक दावे-प्रतिदावे होत असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी या विलीनीकरणाबाबत एक मोठा दावा केला. ते म्हणाले, “मला विलीनीकरणावर बोलायचं नाही, पण एक विषय मांडतो. दोन पक्ष एकत्र आले असते, दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत. भावनिकदृष्टीकोनातून, जर विलीनीकरण झालं असतं तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे झाले असते. विलीनीकरणावर मी बोलणार नाही. कारण चर्चा भरकटते.” रोहित पवारांनी हे सांगितले की, दुसऱ्या गटातील लोकांना विलीनीकरणावर बोलायला आवडते, पण आम्ही फक्त अपघात किंवा घात यावर बोलत आहोत. पुढे बोलताना रोहित पवारांनी (Rohit Pawar) विलीनीकरणाच्या चर्चेच्या संदर्भात काही धक्कादायक खुलासे केले. ते म्हणाले की, अमोल कोल्हेंना विलीनीकरणाचा विषय माहीत आहे आणि अमोल कोल्हेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले पाहिजे ही दादांची इच्छा होती. या विलीनीकरणासाठी एकूण १३ बैठका झाल्या होत्या. रोहित पवारांनी हे सुचवले की, ज्या घरात या बैठका झाल्या, त्या घराजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासा. तसेच ट्रॅफिकचे फुटेज पाहा आणि जर आवश्यक असेल तर मंत्री लोढा यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही तपासा. ते पुढे म्हणाले की, दादा १३ वेळा वेगवेगळ्या गाडीतून विलीनीकरणाची चर्चा करण्यासाठी आले होते आणि हे घर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे होते. जयंत पाटलांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, दादांना पार्टी वाढवायची होती. या संपूर्ण घटनाक्रमाने महाराष्ट्रातील राजकारणात नवीन वादळ निर्माण झाले आहे. एकीकडे अपघाताच्या चौकशीवरून शंका उपस्थित होत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रोहित पवारांच्या या दाव्यांमुळे पक्षांतर्गत आणि बाहेरील चर्चांना वेग आला असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी काय घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.