जळगाव : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यावर डान्सबारबाबत केलेल्या आरोपांवर बोलणे टाळले, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. बाईंना अजूनही त्यांचे काम माहिती नाही ? सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारुन सांगणार का? असा सवाल रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांना केला आहे. प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, महिला आयोगाच्या अध्यक्षांना अजूनही त्यांचे काम माहिती नाही. राज्यातील बार डान्स, बारबाला, सरकारमधील मंत्र्यांचा त्यात असलेला संबंध यावर पत्रकार प्रश्न विचारत आहेत, जो महिलांशी संबंधित आहे. महिला आयोगाशी संबंधित आहे. पत्रकारांनी उखाणा घ्यायला सांगितल्या सारखं काय नकार देता ? असा टोलाही रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांना लगावला. मागच्या आठवड्यात एका सर्व्हेनुसार २०२४-२५ या कालावधीत १८ वर्षांखालील बेपत्ता मुलींची संख्या ४ हजार ९६ आहे आणि १८ वर्षांवरील महिलांची संख्या ३३ हजार ५९९ इतकी आहे. तुमचे महिला आयोग यावर काय पाऊले उचलत आहे ? तुम्ही याबाबत काही धोरण तयार केले आहे का ? की सगळंच तुमच्या प्रदेशाध्यक्षांना विचारून सांगाल ? असा चिमटाही रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांना काढला.