Rohini Khadse-Khewalkar : राज्यातील 1.05 कोटी लाडक्या बहिणी अपात्र; रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारने राज्यातील तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवल्याबद्दल राष्ट्रवादीच्या(शप) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse-Khewalkar) यांनी टीका केली आहे.

Rohini Khadse-Khewalkar : सरकारने राज्यातील तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवल्याबद्दल राष्ट्रवादीच्या(शप) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse-Khewalkar) यांनी टीका केली आहे. खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर हा घणाघात केला आहे.
खडसे (Rohini Khadse-Khewalkar) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, राज्य विधिमंडळात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि तज्ज्ञ मंडळी यावर भाषणे ठोकतील. मात्र दुसरीकडे राज्य सरकारने आतापर्यंत तब्बल 1.05 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले आहे. सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे ? असा सवाल त्यांनी केला आहे.
जेव्हा सरकारने ही योजना सुरू केली तेव्हा काय परिस्थिती होती? सुरुवातीचे लाभार्थी 2.53 कोटी होते. त्याचे बजेट 45,000 कोटी रुपये होते. तपासणीनंतर संभाव्य पात्र लाभार्थी हे १ कोटी ४९ लाख इतके होते. तर 2026-27 च्या बजेटमध्ये तरतूद ही 26,500 कोटी इतकी केली आहे.
तर अपात्र महिला या सुमारे 1.05 कोटी ठरल्या आहेत. म्हणजे निवडणूक होती तेव्हा शासनाने सरसकट लाडक्या बहिणींना पैसे दिले. मात्र, आता निवडणुका जिंकल्या तर हळूहळू लाडक्या बहिणींवरचे प्रेम कमी होऊ लागले, अशी टीका खडसे यांनी केली आहे.
दरम्यान, आखाती देशातील संघर्षामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे. मुंबई, पुणे या शहरांमध्ये हॉटेल्स, खानावळी हळूहळू बंद होत आहेत. याठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. तसेच परिस्थिती आटोक्यात आली नाही तर घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात होईल. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून तोडगा काढावा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशारा खडसे यांनी दिला आहे.





