साताऱ्यात धारदार शस्त्र हातात घेऊन टोळक्यांकडून अपार्टमेंटवर दगडफेक

नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण 

सातारा: सातारा येथील गडकरआळी परिसरातील पेढ्याचा भरोबा येथे दहा ते बाराजणांनी हातात धारदार शस्त्रे नाचवत दहशत माजविली. त्यानंतर तेथील अपार्टमेंटमध्ये दगडफेक करत खिडकीच्या काचांचे नुकसानही केले. ही घटना शुक्रवारी रात्री साठे आठच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, पूर्वी झालेल्या वादातून दहा ते बाराजणांनी शुक्रवारी रात्री हातात धारदार शस्त्र आणि काठ्या घेऊन जोरजोरात ओरडत दहशत माजविण्यास सुरूवात केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तेथे असणाऱ्या एका अपार्टमेंटवर संबंधित टोळक्याने तुफान दगडफेकही केली. यामध्ये अपार्टमेंटच्या खिडकीच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी जादा कुमक घेऊन घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी काही संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला, हे रात्री उशिरापर्यंत पुढे आले नव्हते. पोलीस संबंधितांकडे कसून चौकशी करत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.