Roasted Cumin Benefits : भारतीय स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा जिरा केवळ पदार्थांची चव वाढवतो असं नाही, तर तो आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे. आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते, कच्च्या जिऱ्यापेक्षा भाजलेला जिरा अधिक फायदेशीर मानला जातो. योग्य पद्धतीने घेतल्यास तो पचन, वजन नियंत्रण, रक्तातील घटक आणि हार्मोनल समतोल राखण्यास मदत करतो. आयुर्वेदात जिऱ्याला पचनशक्ती वाढवणारा आणि वात-कफ दोष कमी करणारा मानलं आहे. चरक संहितानुसार जिरे हा उत्तम पाचक आहे. जिऱ्यामधील पोषक घटक जिऱ्यामध्ये क्युमिनाल्डिहाइड, थायमॉल, टरपीन, तसेच आयर्न, मॅग्नेशियम आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक पचन सुधारतात, गॅस आणि पोटफुगी कमी करतात. यामुळे मेटाबॉलिझम संतुलित राहतो. तसेच रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. जिरे कसे घ्यावे? महिलांसाठी जिरा हा आयर्नचा चांगला स्रोत आहे. तो हिमोग्लोबिन वाढवतो आणि स्तनपानाच्या काळात दूधाची गुणवत्ता सुधारतो. वजन कमी करण्यासाठी आणि शरीर डिटॉक्ससाठी जिरे पाणी उपयुक्त आहे. रात्री एक चमचा जिरे भिजत घाला आणि सकाळी उकळून कोमट पाणी प्या. भाजलेल्या जिऱ्याचा उपयोग भाजलेल्या जिऱ्याची पूड पचनासाठी फारच फायदेशीर ठरते. जेवणानंतर चिमूटभर भाजलेला जिरे चूर्ण घेतल्यास गॅस, आंबट ढेकरा आणि पोटदुखीत लवकर आराम मिळतो. जिरे भाजल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म अधिक वाढतात. जिरे, बडीशेप आणि धणे समान प्रमाणात उकळून पाणी प्यायल्यास हार्मोन्स संतुलित राहतात, पाळीच्या तक्रारी आणि लघवी करताना होणारी जळजळ कमी होते. तसेच ताकात भाजलेला जिरे, सेंधं मीठ किंवा काळं मीठ मिसळून प्यायल्यास पोट साफ होतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. प्रमाणात सेवन आवश्यक जिरे हा केवळ फोडणीसाठीचा मसाला नसून पचन, वजन, रक्त आणि हार्मोनसाठी नैसर्गिक संरक्षक आहे. मात्र त्याचं सेवन मर्यादेत करावं. दिवसाला एक-दोन चमच्यांपेक्षा जास्त घेतल्यास पोटात जळजळ होऊ शकते. गर्भवती महिलांनी जिरे कमी प्रमाणात घ्यावेत. मधुमेहावर तो उपयुक्त असला तरी औषधांचा पर्याय नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.