कात्रज बसस्टॅंडची वाट खड्डयाची ;रस्त्यावरील डांबर उखडल्याने अपघाताचा धोका

कात्रज – दत्तनगर चौकाकडून कात्रज पीएमपीएल बस स्टॅन्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील डांबर निघून फक्त माती व खडी शिल्लक राहिल्याने अनेक ठिकाणी रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी स्वार घसरून पडत आहेत.
कात्रज बस स्टॅन्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर आनंद दरबार समोरून पुढे गेल्यानंतर आगम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे आहेत, यामुळे सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
कात्रज-देहू बाह्यवळण रस्त्यालगत हा रस्ता असून शेजारी सर्विस रस्त्याचे काम सुरू आहे. आगम मंदिरकडे जाणाऱ्या चढाच्या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.
कात्रज बस स्टॅन्डकडून दत्तनगर चौकमार्गे जांभुळवाडी, कोळेवाडी, नऱ्हे, आंबेगावकडे जाणाऱ्या बसेस याच रस्त्याने जात असल्याने व अवजड वाहनांचीही याच रस्त्यावर ये-जा सुरू असल्याने खड्ड्यांचे प्रमाण वाढत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नांमध्ये वाहनांचे अपघात होण्याचा धोका आहे. पथ विभागाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिकांना व वाहन चालकांना नाहक संतापाला सामोरे जावे लागत आहे.
कात्रज बस स्टॅन्डकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, पावसाच्या पाण्याने पुन्हा खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक बसविण्याचे नियोजन असून पाऊस कमी झाल्यानंतर संपूर्ण रस्त्याचे काम नव्याने केले जाईल.
– महेश उपरे, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग
कात्रजकडून दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कात्रज-संतोष नगर व परिसरातील भागात राहणाऱ्या नागरिकांना या रस्त्याने कामानिमित्त बाहेर पडावे लागते. मात्र, खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. पथक विभागामार्फत रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता पक्का रस्ता करण्यात यावा.
– ऍड. संभाजी थोरवे, सामाजिक कार्यकर्ते, कात्रज





