Road Safety : रस्त्याच्या मधोमध ‘यमराज’ उभा? तळेगाव ढमढेरे येथील धोकादायक आडाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
Road Safety : तळेगाव ढमढेरे येथील मुख्य रस्त्यावर जुना आड ठरतोय अडथळा; राष्ट्रीय महामार्ग ५४८ ला जोडणाऱ्या मार्गावर अपघाताची भीती.

Road Safety – वेळ नदीकाठच्या मुख्य रस्त्यावर मध्यभागी असलेला जुना आणि निकामी आड सध्या वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. राष्ट्रीय महामार्ग ५४८ ला जोडणाऱ्या या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते, मात्र रस्त्याच्या मधोमध असलेल्या या आड्यामुळे भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली असून हा आड तातडीने हटवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बाजार मैदान, कुंभार आळी ते श्रीनाथ मंदिर या भागाला जोडणारा हा रस्ता गावातील अंतर्गत वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पुणे-अहिल्यानगर मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास सणसवाडीकडे जाणारी अनेक वाहने याच मार्गाचा वापर करतात. सध्या हा आड पूर्णपणे कोरडा असून त्याचा कोणताही वापर होत नाही.
उलट, त्यात कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आडाजवळ रस्त्याला अचानक वळण देण्यात आले असून, कड्याभोवती केवळ दगडांची जुजबी मांडणी केली आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात अपरिचित चालकांना या आडाचा अंदाज येत नाही, ज्यामुळे येथे सतत अपघाताची टांगती तलवार असते.
दिंडोरी येथे विहिरीत कार कोसळून झालेल्या दुर्घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता, प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
“सदर आड बुजविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मागील कार्यकारणीने ठराव केला आहे. मात्र आजपर्यंत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. संभाव्य धोका लक्षात घेता भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी वेळेत योग्य ती कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे.”
– राकेश भुजबळ, माजी उपसरपंच, तळेगाव ढमढेरे
“तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदीकाठचा हा आड प्रत्यक्ष रस्त्यावर येत असल्याने बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना तो वेळेवर दिसत नाही. सध्या हा आड पूर्णपणे कोरडा असून त्याचा कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे उपयोगात नसलेला हा धोकादायक आड तातडीने काढून टाकावा.”
– नवनाथ भुजबळ, चेअरमन, आरंभ उद्योग समूह





