Road Rage Murder – मद्यधुंद चालकाने खासगी बसवरील चालकाला धडक देऊन त्याला फरफटत नेत खाली पाडल्यानंतर त्याच्या अंगावरून गाडी घातल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी देवाची येथे घडला आहे. सागर बाळासाहेब सायकर (रा. शेवाळवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रॅव्हल्स चालकाचे नाव आहे. याबाबत विजय तानाजी शिर्के (४१, रा. सातवाडीस, हडपसर) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कार चालक कृष्णा गोपाळ कोईलवाड (३०, रा. ब्रोथी, जि. लातूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि मयत यांच्या ट्रॅव्हल्स बस आहेत. ते चालक म्हणून काम करीत होते. दोन ट्रॅव्हल्स घेऊन ते १२ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजता वडकी येथून काही महिलांना घेऊन अक्कलकोट येथे जाणार होते. हडपसर-सासवड मार्गावर दोन्ही ट्रॅव्हल्समध्ये एक एर्टिगा कार येऊन जागा देत नव्हती. त्यामुळे तक्रारदार यांनी ट्रॅव्हल्स बस थांबवून मागून येणाऱ्या एर्टिगा कारला थांबवून काय अडचण आहे, असे विचारले. यावेळी मयत सायकर आणि अभिजित जमदाडे येथे उभे होते. त्यावेळी दारूच्या नशेत असणाऱ्या एर्टिगा कार चालकाने सायकर यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना फरफटत नेले. ब्रेक लावल्याने सायकर खाली पडले. त्यानंतर त्यांच्या अंगावरून पुन्हा कार घालून त्यांना गंभीर जखमी केले. सायकर यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.