अति घाई.. मृत्यूला आमंत्रण! नियंत्रण सुटलं आणि बोलेरो थेट कालव्यात कोसळली, 7 ठार

संबळपूर – ओडिशातील संबलपूर येथे शुक्रवारी सकाळी एक रस्ता अपघात झाला. संबलपूर येथे कार कालव्यात पडल्याने सात जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे 2 वाजता चालकाचे वेगवान बोलेरोवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे हा अपघात झाला.
पोलिसांचे म्हणणे आहे की बोलेरोमध्ये स्वार असलेले लोक गुरुवारी एका लग्न समारंभात सहभागी झाल्यानंतर झारसुगुडा जिल्ह्यातील बराधरा येथे त्यांच्या घरी जात होते. यावेळी कारचा वेग जास्त होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो सासन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परमानपूरजवळ कालव्यात पडली.
संबलपूरचे जिल्हाधिकारी अनन्या दास यांनी सांगितले की, अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, आणखी एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.




