मुंबईहुन पिकनिकला आलेल्या 4 विद्यार्थ्यांचा खालापूरजवळच्या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

रायगड : मुंबईतील रिझवी कॉलेजचे चार विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पावसाळी सहलीसाठी खालापूर येथील धरणात पोहण्यासाठी गेले असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धरणात बुडालेले विद्यार्थी मुंबईच्या बांद्रा येथील रिझवी कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. सुमारे 37 तरुण-तरुणी या सहलीसाठी गेले होते, त्यापैकी चार जण बुडले. या दुर्दैवी घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
खालापूरच्या पोखरवाडीयेथील तलावात पोहताना खोलीचा अंदाज न आल्यामुळे त्या 4 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ईशांत यादव, आकाश माने, रनक बंदा, एकलव्य सिंग अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत्यू झालेल्यांचं पार्थिव चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे.
खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पोखरवाडीतील स्थानिक युवकांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.





