Riyadh Season: गाझात युध्द सुरू असताना उत्सव कशाला? रियाध फेस्टिव्हलमुळे सौदीवर होतेय टीका

रियाध – सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये सीझन फेस्टिव्हल सुरू आहे. रियाध सीझन फेस्टिव्हल 12 ऑक्टोबरपासून सुरू झाला. तेव्हापासून येथे सातत्याने कार्यक्रम सुरू आहेत, मात्र काही काळापासून हा उत्सव सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर आला आहे.
मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात गाणी, संगीत आणि जगातील प्रसिद्ध स्टार्सच्या उपस्थितीवरून सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यावर दोन प्रकारे टीका केली जात आहे. एकीकडे लोक त्यांच्यावर गाझाबद्दल असंवेदनशील असल्याचा आरोप करत आहेत, तर दुसरीकडे सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी 2019 मध्ये सुरू केलेला रियाध सीझन हा सौदी आणि इस्लामिक संस्कृतीच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे.
हा फेस्टीव्हल सलमान यांच्या व्हिजन 2030 चा पर्यटनाला चालना देऊन अर्थव्यवस्थेत विविधता आणण्याचा एक उपक्रम असल्याचे म्हटले जाते. दरवर्षी लाखो लोक या उत्सवाला भेट देतात. या वर्षीही सौदीने अनेक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांचे यजमानपद भूषवले आहे. त्यापैकी काही जण संगीत जगतातील मोठे स्टार आहेत.
लेबनॉन आणि गाझा येथे सुरू असलेल्या युद्ध सुरू असतानाच हा फेस्टीव्हल होत असल्यामुळे त्यावर टीका केली जाते आहे. सोशल मीडियावरील काही लोकांचा असा युक्तिवाद आहे की गाझा आणि लेबनॉनमध्ये दीर्घकाळ चाललेल्या युद्धांमध्ये असे समारंभ आयोजित केल्याने चांगला संदेश जात नाही.
रियाध सीझन 2023 मध्येही अशा गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. युध्द सुरू असताना फेस्टीव्हल घेण्यावर टीका झाली होती. कारण गेल्या वर्षीही गाझामध्ये इस्रायलचा हल्ला सुरू होता. मात्र, सोशल मीडियावर टीका होत असतानाही गेल्या वर्षी सुमारे दोन कोटी लोक या महोत्सवाला आले होते.




