River Pollution: जीवनवाहिन्या की मृत्यूचे सापळे? ६०० एमएलडी मैलापाणी थेट नदीत; महापालिकेचा धक्कादायक कारभार
River Pollution: मैलापाण्यामुळे नदी पात्रात पांढरा फेस आणि मासे मृत होण्याचे सत्र सुरू; नदीकाठच्या रहिवाशांना वर्षभर डासांचा आणि दुर्गंधीचा अतोनात त्रास.

River Pollution – शहराच्या जीवनवाहिनी असलेल्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्या सध्या तीव्र प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. शहरात दररोज निर्माण होणाऱ्या एकूण सांडपाण्यापैकी ६०० दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट नद्यांमध्ये मिसळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महापालिका प्रशासनाकडून सध्या केवळ ४०० एमएलडी सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जात असून, उर्वरित मैलापाणी थेट नद्यांच्या पात्रात मिसळले जात आहे. त्यामुळे शहरातील नद्यांची अक्षरशः गटारगंगा झाली आहे.
महापालिकेकडून पवना नदीतून दररोज ५५० एमएलडी पाणी घेऊन ते शुद्ध करून शहराला पुरवले जाते. तसेच, एमआयडीसीकडून दररोज ३० एमएलडी शुुद्ध पाणी विकत घेतले जाते. ते पाणी एमआयडीसी पवना नदीतूनच उचलते. आंद्रा पाणी योजनेतून दररोज १०० एमएलडी पाणी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील बंधार्यातून उचलले जाते. तर, मुळा नदीतून महाापालिका पाणी उचलत नाही. महापालिका असे दररोज एकूण ६८० एमएलडी पाणी संपूर्ण शहराला पुरवत आहे.
तसेच, काही नागरिक, हाऊसिंग सोसायट्या, बंगलोधारक बोअरींग, विहीर, खासगी टँकर तसेच, पुर्नवापर केलेल्या पाण्याचा वापर करतात. असे एकूण एक हजार एमएलडी पाणी दररोज शहवासियांकडून वापरले जाते. त्यातून तितकेच सांडपाणी तयार होते. या निर्माण झालेल्या एकूण सांडपाण्यापैकी केवळ ४०० एमएलडी सांडपाण्यावर महापालिकेकडून प्रक्रिया केली जाते. महापालिकेचे शहरभरात ४२३ एमएलडी क्षमतेचे एकूण २२ मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) आहेत. त्यातून दररोज ४०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होते, असा दावा महापालिकेने केला आहे.
त्यामुळे तब्बल ६०० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न होताच नदी पात्रात मिसळत असल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेच्या अनेक ड्रेनेजलाईन फुटल्या आहेत. त्यातून सांडपाणी नाले, रस्ते, कच्च्या रस्त्यामार्फत थेट नदीपात्रात मिसळते. नदी काठावरील काही ड्रेनेजलाईन जाणीवपूर्वक फोडल्या जातात, असा आरोप पर्यावरणप्रेमीकडून वारंवार केला जात आहे. तसेच, महापालिकेच्या एसटीपीतून प्रक्रिया न केलेले सांडपाणी रात्रीच्या वेळेत थेट नदीत सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
या सर्व कारणांमुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्रक्रिया न केलेले सांडपाणी मिसळत असल्याचे दिसून येत आहे. जलपर्णी फोफावण्याचे ते एक मुख्य कारण आहे. परिणामी, नदी पात्राचे पाणी अधिक दूषित झाले आहे. नद्यांची अक्षरश: गटारगंगा झाली आहे. नदी पात्रातून प्रचंड दुर्गंधी येते. नदी काठच्या परिसराला वर्षभर डासांचा मोठा प्रादुर्भाव सहन करावा लागतो. तर, काही भागात पात्रात पांढरा फेस तयार होतो आणि मासे मृत होत आहेत.
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन २० एमएलडी क्षमतेच्या एका एसटीपीचे सध्या बांधकाम सुरू आहे. एकूण ४३५ एमएलडी क्षमतेचे १२ एसटीपी बांधण्याचे नियोजन आहे. पात्रातील जलपर्णी तात्काळ काढली जात आहे. एकूण २२ एसटीपीतील प्रकिया केलेले ७० ते ८० एमएलडी पाणी विविध उद्याने आणि औद्योगिक कंपन्यांना वापरासाठी दिले जात आहे. त्यातून महापालिकेस दरमहा १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. भविष्यात १०० एमएलडी क्षमतेचा पुनर्वापर, पुनर्चक्रिकरण प्रकल्प उभारुन पिण्यायोग्य पाणी देण्याचे नियोजन आहे.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता






