Ritika Shrotri : मराठी अभिनेत्री रितिका क्षोत्रीने नुकताच ‘रेड २’ चित्रपटातील आपला अनुभव शेअर केला आहे. अजय देवगण, रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला असून २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘रेड २’ ने स्थान मिळवलं आहे. या सिनेमात रितिकाही एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली. ऑडिशनपासून मोठ्या संधीपर्यंत एका मुलाखतीत रितिकाने सांगितले,“या चित्रपटासाठी मी पहिल्यांदा ऑडिशन दिलं होतं. त्यानंतर मला निवड झाल्याचा फोन आला. माझं शूट लखनौमध्ये अवघ्या पाच-सहा दिवसांचं होतं, ज्यात काही सीन होते. ही माझ्यासाठी मोठी संधी होती म्हणून मी तयारी खूप मन लावून केली होती. पण सेटवर गेल्यावर जाणवलं की, आता तयारीपेक्षा समोर जे येतंय त्याला प्रतिसाद देणं अधिक महत्त्वाचं आहे.” रितेश देशमुखसोबत खास क्षण रितिकाने रितेश देशमुखसोबत काम करण्याचा अनुभव खास असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, “माझा पहिला सीन रितेश सरांबरोबर होता. मी त्यांची मोठी चाहती असल्यामुळे खूपच नर्व्हस झाले होते. पण ते अतिशय साधेपणाने, आदराने बोलतात. त्यामुळे वातावरण हलकं-फुलकं झालं. आमचे अनेक सीन झाले. पहिल्यांदा वाईड शॉट झाला आणि नंतर क्लोज शॉट सुरू झाला. माझ्या क्लोज शॉटसाठी रितेश सर स्वतः सेटवर थांबले होते. बऱ्याचदा कलाकार दुसऱ्याच्या क्लोजसाठी थांबत नाहीत, पण त्यांनी खास माझ्यासाठी तिथे उपस्थित राहणं निवडलं. तो क्षण माझ्यासाठी खूप स्पेशल होता.” अजय देवगणसोबत काम रितिकाने अजय देवगणसोबतच्या अनुभवाबद्दलही सांगितलं, “दोन-तीन दिवसांनी माझा सीन अजय सरांबरोबर होता. तो सीन अवघ्या चार मिनिटांतच शूट झाला आणि पहिल्याच टेकमध्ये चांगला झाला. मात्र, क्लायमॅक्स शूट माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील असं होतं. त्या वेळी सेटवर जवळपास हजार ते पंधराशे लोक होते आणि तीन दिवस सलग ते सीन शूट होत राहिले. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेलं शूट पाहून मी भारावून गेले.” रितिका क्षोत्रीने ‘रेड २’ मधून बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांसोबत काम करताना मिळालेला अनुभव शेअर करताना अनेक आठवणींना उजाळा दिला. रितेश देशमुखचा साधेपणा आणि अजय देवगणसोबतचा शॉट तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे.