पिंपरी | दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीला अलिकडेच पूर आला होता. त्यानंतर शहरातील नागरिकांना नळाद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी वाढू लागल्या आहेत.
विशेषत: चिंचवड परिसरात गढूळ पाणी पुरावठा होत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी येऊ लागल्या आहेत. या पाण्यामुळे आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे.
पूरामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याची शक्यता अधिक असते. दूषित पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजारांचा धोका निर्माण होतो.
चिंचवडमधील आणि रावेत परिसरात गेल्या काही दिवसांपासून अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येथील सोसायटीधारकांनी केल्या आहेत. तसेच पाण्यामध्ये अळया आढळून आल्या आहेत अशी तक्रार महापालिकेच्या सारथी संकेतस्थळावर नागरिकांनी केल्या आहेत.
पावसाळ्यात नदीचे पात्र विस्तीर्ण होते आणि आसपासची माती व कचरा नदीच्या पाण्यासोबत येऊ लागतात. पावसाच्या पाण्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होते. पालिकेने विशेषत: पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित व गढूळ न होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी नागरिक करित आहेत.
महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांची वर्षातून दोनदा स्वच्छता होते. पावसाळ्यात पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता योग्यरीत्या न झाल्यास पाणी दूषित होते. अनेकांना गढूळ व दूषित पाणी येत असल्याच्या, तसेच काही पाण्याच्या वाहिन्या जुन्या झाल्या आहेत, फुटल्या आहेत, गळती होत आहे अश्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
आजारांपासून वाचण्यासाठी काय करावे-
पाणी उकळून प्यावे. इमारतीमधील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करावी. नळ गळती, व्हॉल्व गळती असेल तर दुरुस्त करावी.
टाकी भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, साठवणुकीचे पाणी झाकून ठेवावे, जास्त दिवस पाणी साठवू नये, आठवड्यातील एक कोरडा दिवस पाळावा, भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून धुवून, पुसून आणि कोरडी ठेवावी. तसेच जलजन्य आजार बळावल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.





