Boraj Bridge: सुरक्षा कठडे नसल्याने अपघाताचा धोका; बोरज पुलाजवळील पर्यायी रस्ता ठरतोय घातक
Boraj Bridge: चारचाकीच्या दुर्घटनेनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष

कार्ला – बोरज पुलाजवळील पर्यायी रस्त्यावर सुरक्षा कठडे नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकताच याच ठिकाणी एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला.
सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली. मात्र अपघातानंतरही धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
बोरज पुल परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. या पर्यायी रस्त्याचा वापर स्थानिक नागरिकांसह इतर वाहनचालकांकडूनही मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, या रस्त्याच्या काही भागात रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडे नसल्याने वाहनचालकांसाठी हा भाग धोकादायक ठरत आहे.
रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी खोलगट भाग आहे. त्यामुळे वाहनाचा ताबा सुटल्यास वाहन थेट रस्त्याच्या खाली जाण्याची शक्यता आहे. विशेषतः पावसाळ्यात हा धोका अधिक वाढतो. रस्त्याच्या कडेचा अंदाज न आल्यास किरकोळ चूकही गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकते.
त्यामुळे बोरज पुलाजवळील पर्यायी रस्त्याची संबंधित विभागाने तातडीने पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक भागात मजबूत सुरक्षा कठडे बसवावेत. आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक लावावेत.
तसेच रात्रीच्या वेळीही वाहनचालकांना रस्त्याचा स्पष्ट अंदाज यावा, यासाठी आवश्यक ठिकाणी प्रकाशव्यवस्था किंवा परावर्तित करणारे सुरक्षा साहित्य बसविण्याची मागणीही स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.
रात्रीचा प्रवास अधिक धोकादायक
पावसाळ्यात पर्यायी रस्त्याची परिस्थिती आणखी बिकट होते. पावसामुळे रस्त्याच्या कडा आणि धोकादायक भाग स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यातच रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण जाते.
समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश डोळ्यांवर पडल्यास किंवा पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्यास रस्त्याच्या कडेचा अंदाज चुकण्याची शक्यता असते. अशा वेळी वाहन घसरणे किंवा रस्त्याच्या खाली जाण्याचा धोका निर्माण होतो.
अपघातानंतरही उपाययोजना नाहीत
नुकत्याच झालेल्या चारचाकी वाहनाच्या अपघातामुळे या ठिकाणी असलेला संभाव्य धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, भविष्यातील गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आता तरी या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
एखादा अपघात झाल्यानंतर केवळ मदतकार्य करण्यापेक्षा अपघात होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. धोकादायक ठिकाणांची पाहणी करून तेथे सुरक्षा व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. मात्र, बोरज पुलाजवळील पर्यायी रस्त्यावर अद्यापही सुरक्षा कठड्यांचा अभाव असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
DJ No entry: तळेगावातील गणेशोत्सवात डीजेला नो एंट्री; मोठ्या आवाजाच्या वाद्यांना परवानगी नाही





