वाढती बालगुन्हेगारी ठरतेय डोकेदुखी

गंभीर गुन्ह्यात सहभाग : पाच महिन्यांत 82 बाल आरोपी ताब्यात
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात बालगुन्हेगारांचा वाढता सहभाग पोलीस आणि नगारिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये तब्बल 82 बाल आरोपींना गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. वाढती बालगुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
गेल्या आठवड्यात घडलेल्या तीन गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये बाल आरोपींचा समावेश होता. त्यातील पहिली घटना भिवंडी येथे चाललेल्या एका पादचाऱ्याचा अवघ्या पाचशे रुपयांसाठी तीन अल्पवयीन मुलांनी डोक्यात दगड घालून खून केला. दुसऱ्या घटनेत पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका टोळक्याने पिंपळे निलख येथील वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
अवघ्या काही तासांत 11 आरोपींना पकडण्यात आले, मात्र त्यापैकी सातजण अल्पवयीन होते. तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलाकडून लॅपटॉप व मोबाईल असा दीड लाखांचा चोरीचा ऐवज हस्तगत केला. तसेच राज्यभर गाजलेल्या विराज जगताप खून प्रकरणातील सहापैकी दोन आरोपीही अल्पवयीन मुले असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या पाच महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या माहितीवर एक नजर टाकली तर छोट्या मोठ्या चोऱ्या, बलात्कार, प्राणघातक हल्ले, तोडफोड ते अगदी खूनापर्यंत सर्वच अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन आरोपी असल्याचे दिसून येते. गेल्या पाच महिन्यात 82 बाल आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आकडेवारीवरून याची तीव्रता लक्षात येते. बालगुन्हेगारीत 16 ते 18 वयोगटातील मुलांचे प्रमाण 70 टक्के इतके आहे.
बाल गुन्हेगारी वाढण्याची कारणे
“भाई’ बनण्याचे आकर्षण, पैसे कमाविण्यासाठी गुन्हेगारीचा शॉर्टकट, व्यसनपूर्तीसाठी पैशाची गरज, आजूबांच्या लोकांचे श्रीमंती राहणीमान, मोबाइल-टॅब यासारख्या वस्तूंचे आकर्षण इत्याची कारणांमुळे मुले गुन्हेगारीकडे वळतात. चित्रपट, टीव्हीवरील हिंसक व कामुक दृष्ये, अश्लील चिपट पाहण्याची सवय, इंटरनेटचा गैरवापर यामुळे उच्चभ्रू कुटूंबातील अल्पवयीन मुलेही गुन्हे करण्यास प्रवृत्त होत असल्याचे अनेक घटनांमध्ये पोलिसांना दिसून आले.
पोलिसांकडून अपुरे प्रयत्न
पिंपरी चिंचवड शहरातील बाल आरोपींची यादी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाणे स्तरावर तयार करण्यात आली. या बाल आरोपी आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याची घोषणाही केली. पोलिसांकडून स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने काही कार्यशाळाही घेण्यात आल्या. मात्र त्यामध्ये पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. गुन्हेगारी कृत्यांपासून अल्पवयीन मुलांना दूर नेण्यासाठी आणखी प्रयत्नांची आवश्यकता आहे.





