Rishi Sunak: भारतीय वंशाचे ऋषी सुनक झाले ब्रिटनचे पंतप्रधान, शुभेच्छांचा वर्षाव

लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याने भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी एक इतिहास रचला आहे. त्यांचे भारताशी असलेले संबंध पाहता भारतीयांना अभिमान वाटावा, अशी त्यांची कारकीर्द असल्याचे लक्षात येते. भारतीयांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यॉर्कशायर येथून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ऋषी सुनक यांनी ब्रिटनमधील संसदेच्या सदस्यत्वाची शपथ भगवद् गीतेवर हात ठेवून घेतली होती. ब्रिटनच्या संसदेमध्ये एखाद्या खासदाराने गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्याचे हे आतापर्यंतचे पहिलेच उदाहरण होते.
ऋषी सुनक यांचे पालक भारतीय वंशाचे आहेत. व्यवसायाने फार्मसिस्ट असलेले त्यांचे पालक 1960 मध्ये पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक असलेल्या नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती या दाम्पत्याचे ते जावई आहेत. मूर्ती दाम्पत्याच्या कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी ऋषी सुनक यांचा विवाह झाला आहे. कृष्णा आणि अनुष्का अशी त्यांच्या दोन कन्यांची नावे आहेत. आपल्या सासू-सासऱ्यांना भेटण्यासाठी ते नेहमी आपली पत्नी आणि दोन्ही कन्यांसह बेंगळुरू येथे भेट देत असतात.
बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असताना ऋषी सुनक हे डाऊनिंग स्ट्रीटवरील आपल्या निवासस्थानी दिव्यांची रोषणाई करून दिवाळी साजरी करत असत. त्यांना लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड आहे.
ऋषी सुनक नेहमीच भारताच्या उज्वल परंपरेविषयी आणि संस्कृतीविषयी आदराने बोलत असतात. आपल्या कुटुंबाने आपल्यामध्ये भारतीय संस्कृतीची बीजे कशी पेरली हे त्यांना अजूनही स्मरणात आहे.
ऋषी सुनक हे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील पदवीधर आहेत. ते पूर्वी गुंतवणूक सल्लागार आणि बॅंकिंग व्यावसायिक होते.
यापूर्वी पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळवण्याच्या प्रचारादरम्यान त्यांच्या उंची राहणीमानावरून त्यांच्यावर टीका केली जात होती. मात्र असा तणावाच्या प्रसंगी आपल्याला भगवत गीतेतूनच मार्गदर्शन मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे.





