ऋषी आगरवाल यांची सीबीआयकडून पुन्हा चौकशी
Updated On:

नवी दिल्ली – देशातील सर्वांत मोठ्या बॅंक घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने सोमवारी पुन्हा ऋषी आगरवाल यांची चौकशी केली. ते एबीजी शिपयार्ड लि.कंपनीचे माजी अध्यक्ष आहेत.
त्या कंपनीने विविध बॅंकांना कर्जाच्या रूपाने तब्बल 22 हजार 848 कोटी रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. सीबीआयने पंधरवड्यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे तो घोटाळा उघड झाला. संबंधित प्रकरणात एबीजी शिपयार्ड बरोबरच तत्कालीन संचालकांना आरोपी करण्यात आले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने मागील आठवड्यात पहिल्यांदा आगरवाल यांची चौकशी केली होती.
त्याआधी सीबीआयने विविध ठिकाणी छापे टाकून काही कागदपत्रेही जप्त केली. त्याशिवाय, आरोपींना देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लूकआऊट नोटिसाही जारी केल्या.





